गुलजारी नदीवर प्रदूषणाचे संकट
गुलजारी नदीवर प्रदूषणाचे संकट
चारोटी नाका येथे उपाहारगृहाचे सांडपाणी रस्त्यावर
कासा, ता. २५ (बातमीदार)ः डहाणू तालुक्यातील चारोटी नाका परिसरात हॉटेल, कोंबडी-मटण विक्रेत्यांच्या दुकानांचे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. या पाण्यामुळे राज्य मार्गालगतच असलेल्या गुलजारी नदी पात्र प्रदूषित होण्याचा धोका वाढला आहे.
चारोटी नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर कोंबडी, मटण विक्रेत्यांची दुकाने आहेत. अनेक वेळा कोंबडीची पिसे, अंतर्गत अवशेष रस्त्यालगत तसेच नदीकिनारी टाकली जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढू शकतो, अशी नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. सध्या चारोटी ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता मोहीम राबवली जात असली तरी रात्रीच्या वेळी काही हॉटेल व्यावसायिक व कोंबडी विक्रेत्यांकडून कचरा, सांडपाणी रस्त्यालगत टाकत असल्याने सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी बाबू गांगड यांच्याकडे विचारणा केली असता संबंधित हॉटेल मालक, विक्रेत्यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या सूचना दिल्या असून, ग्रामपंचायतीतर्फे नियमित स्वच्छता अभियान सुरूच आहे.
---------------------------
चारोटी नाका येथील सांडपाण्याबाबत नोटीस दिली असून, सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- प्रणय मेहेर, उपसरपंच, चारोटी

