चेंबूर स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

चेंबूर स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

Published on

चेंबूर स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण
विद्यार्थी व प्रवाशांना चालणेही कठीण; तात्पुरत्या कारवाईवर नाराजी
चेंबूर, ता. २५ (बातमीदार) ः हार्बर मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या चेंबूर रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवर अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पादचाऱ्यांची गर्दी कमी व्हावी आणि पूर्व द्रुतगती मार्गाकडे जाण्यास सोय व्हावी यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पालिका प्रशासनातर्फे स्कायवॉकची उभारणी करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हा स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी की फेरीवाल्यांसाठी, असा प्रश्न प्रवाशांना पडू लागला आहे.
एमएमआरडीएने कोट्यवधी रुपये खर्च करून चेंबूर रेल्वे स्थानक ते के. टेंबे पुलापर्यंत स्कायवॉक उभारला. सध्या मात्र स्कायवॉक तसेच स्थानक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, स्वामी विवेकानंद कॉलेज, आचार्य कॉलेज, शहा अँड अँकर महाविद्यालय, मुक्तानंद, आदर्श, शुक्ला, ‘आमची शाळा’, तसेच मोनोरेलमार्गे सांताक्रूझ व ठाण्याकडे जाणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशांना चालणेही कठीण झाले आहे.
पालिका प्रशासनाने रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली असतानाही स्कायवॉक व स्थानक परिसरात बिनधास्तपणे व्यवसाय सुरू असल्याचे दिसते. तक्रार केल्यानंतर तात्पुरती कारवाई होते; मात्र काही दिवसांत परिस्थिती पूर्ववत होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. रेल्वे पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
रेल्वे प्रवासी सुरक्षा सेवा संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष धोत्रे व सल्लागार अ‍ॅड. कपिल झोडगे यांनी स्कायवॉक व स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्कायवॉक आणि स्थानक परिसरातील अतिक्रमणाबाबत प्रशासन नेमकी कोणती ठोस कारवाई करणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

चेंबूर स्कायवॉक हा फेरीवाले व भिकाऱ्यांचा अड्डा बनला आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घेतली पाहिजे. प्रवाशांना मार्ग काढताना मोठा त्रास सहन करावा लागतो.
- अ‍ॅड. संतोष धोत्रे, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सुरक्षा सेवा संघ

स्कायवॉक व स्थानक परिसरात फेरीवाले बसल्यामुळे चालताना अडथळे निर्माण होतात. पोलिस कारवाई करतात; मात्र काही दिवसांनी पुन्हा तेच चित्र दिसते. रेल्वे प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा.
- आशालता कदम, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com