‘शिव’ आणि ‘भीम’ महोत्सव रंगणार
अंबरनाथ, ता. २५ (वार्ताहर) : अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारीला ‘शिव महोत्सव’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती ‘भीम महोत्सव’ म्हणून साजरी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी विशेष सर्वसाधारण सभेत केली. या प्रस्तावावर पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे पाटील यांच्या उपस्थितीत चर्चा झाली आणि सभागृहाने तो एकमताने मंजूर केला. त्यामुळे शहरात दोन्ही महामानवांच्या जयंती उत्सवांना अधिकृत आणि व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
सुभाष साळुंके यांनी मांडणीत नमूद केले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम अधिक संघटित आणि भव्य पद्धतीने साजरे होणे आवश्यक आहे. ‘शिव महोत्सवा’तून शिवरायांचा पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि राष्ट्रभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, तर ‘भीम महोत्सवा’तून सामाजिक समता, बंधुता आणि संविधान मूल्यांचा प्रसार व्हावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
सभागृहातील सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला. कोणतीही हरकत नोंदवली न गेल्याने प्रस्ताव एकमताने मंजूर झाला. या निर्णयामुळे शहरात दोन्ही जयंती उत्सव अधिक नियोजनबद्ध, सांस्कृतिक कार्यक्रमांनी समृद्ध आणि व्यापक लोकसहभागातून साजरे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगर परिषदेच्या या निर्णयाचे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्तरांतून स्वागत होत असून, शहरातील नागरिकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

