वेदनांनी विव्हळलेला जीव वाचवण्यासाठी धावली माणुसकी
मुक्या जीवाला मिळाला माणुसकीचा आधार
गंभीर जखमी श्वानावर तातडीने उपचार
टिटवाळा, ता. २५ (वार्ताहर) : डोक्यावर खोल जखम, त्यात पडलेले जंतू आणि असह्य वेदनांनी तडफडाट अशा विदारक अवस्थेत मांडा-टिटवाळा पश्चिम येथील वासुंद्री रोडवरील श्री माऊली कृपा सोसायटी परिसरात एक श्वान गेल्या अनेक दिवसांपासून पडून होता. मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या या मुक्या जीवाला जनता हीच फाउंडेशन आणि महापालिकेच्या पशुवैद्यकीय पथकाच्या तत्परतेमुळे अखेर जीवदान मिळाले आहे.
पंचवटी चौकाच्या पुढे असलेल्या या परिसरात या कुत्र्याची अवस्था पाहून नागरिक हळहळत होते. मात्र, मदतीसाठी कोणी पुढे येत नव्हते. अखेर जनता हीच फाउंडेशनचे रितेश कांबळे आणि नियाज शेख यांची नजर श्वानावर पडली आणि तातडीने महापालिकेच्या पशुवैद्य उपचार केंद्राशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच डॉ. कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आर्यन मोहापे घटनास्थळी दाखल झाले.
विशेष बाब
श्वानाच्या डोक्यावरील जखमेत मोठा संसर्ग झाला होता. जखमेतील जंतू काढून तिथे जंतुनाशक औषधे, मलमपट्टी आणि आवश्यक इंजेक्शन्स देण्यात आली. इतक्या वेदना होत असूनही, उपचारादरम्यान या कुत्र्याने कोणताही आक्रमकपणा दाखवला नाही.
प्रशासनाशी संपर्क साधा
टिटवाळ्यातील या तरुणांनी आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी दाखवलेली संवेदनशीतेचे कौतुक केले जात आहे. मुक्या प्राण्यांप्रती आपली जबाबदारी केवळ हळहळण्यापुरती मर्यादित नसावी. नागरिकांनी अशा घटना पाहिल्यावर प्रशासनाशी संपर्क साधल्यास अनेक जीवांचे प्राण वाचू शकतात. माणुसकी जिवंत ठेवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न होता, असे रितेश कांबळे यांनी म्हटले आहे.

