वैद्यकीय आरोग्य यंत्रणा झोपेत?

वैद्यकीय आरोग्य यंत्रणा झोपेत?

Published on

नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २५ : गरिबी, अज्ञान आणि पैशांची निकड याचा गैरफायदा घेत महिलांच्या गर्भाशयाशी थेट खेळ करणारे अमानुष रॅकेट बदलापूरमध्ये उघडकीस आले आहे. या धक्कादायक प्रकरणाचा थेट संबंध उल्हासनगर शहराशी असल्याने महापालिकेतील निष्क्रिय वैद्यकीय आरोग्य विभागाच्या व्यवस्थेची कार्यपद्धती पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या बेकायदा गर्भाशय अंडी विक्री प्रकरणात अटक केलेल्या चार महिलांपैकी तीन महिला उल्हासनगरच्या आहेत. इतका गंभीर प्रकार घडूनही महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य विभाग पूर्णपणे अनभिज्ञ राहिला की जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

बदलापूर पूर्वेतील जोवेली परिसरात सुरू असलेल्या या रॅकेटचा पर्दाफाश बदलापूर पूर्व पोलिसांनी आणि ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने संयुक्त कारवाईत केला. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत या प्रकरणात आतापर्यंत चार महिलांना अटक केली आहे. यात बदलापूर येथील सुलक्षणा गाडेकरसह उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे आणि सोनल गरेवाल यांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकरणात उल्हासनगर शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
उल्हासनगरमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलांचा अशा प्रकारे वापर होत असताना महापालिकेतील स्थानिक वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नर्सिंग होम नोंदणी विभाग, सोनोग्राफी केंद्रांवरील नियंत्रण यंत्रणा नेमकी काय करत होती?, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. बेकायदा सोनोग्राफी, इंजेक्शन पुरवठा आणि आयव्हीएफशी संबंधित हालचाली शहरातील महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नजरेतून कशा सुटल्या, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
दरम्यान, या रॅकेटमध्ये उल्हासनगर शहरातील डॉक्टर, मध्यस्थ, आयव्हीएफ केंद्र किंवा औषध पुरवठादारांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. यावरून उल्हासनगरसारख्या शहरातील आरोग्य यंत्रणेच्या निष्क्रियतेवर आणि महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे ठरत आहे.

पैशांचे प्रलोभन
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या महिला गरजू महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवत होते. डॉक्टरांचा कोणताही सल्ला किंवा वैध परवानगी नसताना बेकायदा सोनोग्राफी करून हार्मोन्स व इंजेक्शन्स दिली जात होती. गर्भाशयातील स्त्रीबीजांची संख्या वाढल्यानंतर या महिलांना आयव्हीएफ केंद्रात पाठवून शस्त्रक्रियेद्वारे अंडी काढली जात आणि त्यांची बेकायदा विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.


महिलांचे शोषण
छाप्यात आरोपींच्या ताब्यातून गर्भधारणेसाठी वापरली जाणारी इंजेक्शन्स, सोनोग्राफीचे फोटो, खोट्या नावांची सत्यप्रतिज्ञापत्रे, बनावट कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, वारंवार दाता म्हणून वापर करून महिलांचे शारीरिक व मानसिक शोषण करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com