६५० कोटी मालमत्ता करवसुली
६५० कोटी मालमत्ता करवसुली
नवी मुंबईत डिजिटल कर भरण्यास वेग; थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई
वाशी, ता. २५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकाच्या मालमत्ता कर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत तब्बल ६५० कोटी रुपयांची वसुली करीत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे नागरिकांचा डिजिटल माध्यमातून कर भरण्याकडे वाढता कल दिसून येत असून, एकूण वसुलीपैकी ६२ टक्के रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा झाली आहे.
महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक लाख ८२ हजार ८९४ करदात्यांकडून ही वसुली झाली आहे. त्यापैकी ३८३ कोटी रुपये यूपीआय, क्यूआर कोड, डेबिट-क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, एनईएफटी व आरटीजीएसच्या माध्यमातून जमा झाले, तर २६७ कोटी रुपये ऑफलाइन पद्धतीने भरले गेले. घरबसल्या सुरक्षित व पारदर्शक कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांचा ऑनलाइन पर्यायांकडे कल वाढत असल्याचे प्रशासनाने सांगितले. थकबाकीदारांना एसएमएस व व्हॉट्सॲपद्वारे करभरणा लिंक पाठवून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
दरम्यान, कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात महापालिकेने कठोर भूमिका घेत शहरातील ७७ मालमत्तांवर अटकावणीची कारवाई केली असून, त्यातून सुमारे ३९ कोटी रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे. १,६०८ मोठ्या थकबाकीदारांना सात दिवस आणि ४८ तासांच्या जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सध्या औद्योगिक मालमत्तांवर कारवाई सुरू असून, लवकरच व्यावसायिक व वाणिज्य मालमत्तांवरही जप्ती होणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पुढील काळात कारवाई अधिक सक्त करण्याचा इशारा दिला आहे.
चौकट
विकासासाठी करभरणा आवश्यक
मालमत्ता करातून मिळणारा निधी हा शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे प्रलंबित थकबाकी वसूल करण्यासाठी मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. वेळेत कर भरणाऱ्या नागरिकांमुळे विकासकामांना गती मिळणार असून, उर्वरित करदात्यांनीही तातडीने कर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

