वर्षभरात ४१ वाघांचा मृत्यू तर तीन वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्लयात ३९४ व्यक्तींनी गमावला जीव
वर्षभरात ४१ वाघांचा मृत्यू
तीन वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ३९४ मृत्यू
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः राज्यात मागील वर्षात विविध कारणांमुळे ४१ वाघांचे मृत्यू झाले आहेत. यात नैसर्गिकरीत्या २८, अपघातात आठ, विद्युतप्रवाहामुळे चार व शिकारीने एक, अशा एकूण ४१ वाघांच्या मृत्यूंचा समावेश असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. तसेच दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये २०२१-२२ ते डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत तब्बल ३९४ व्यक्तींनी आपला जीव गमावला असल्याची माहितीही वनमंत्र्यांनी दिली.
राज्यात विविध कारणांमुळे वाघांच्या होत असलेल्या मृत्यूंबाबत विधानसभा सदस्य मनोज जामसुतकर, योगेश सागर, चेतन तुपे आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, तर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांच्या होणाऱ्या मृत्यूंबाबत विधानसभा सदस्य संजय मेश्राम, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. वनमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात २०११ ते २०२५ या कालावधीत रेल्वे मार्गावर पाच वाघांचा मृत्यू झाल्याने रेल्वे मार्गावरील जंगलामध्ये वन्यप्राण्यांना ये-जा करण्यासाठी अंडरपास तसेच ओवरपास तयार करणे, तसेच संवेदनशील क्षेत्रात रेल्वेचा वेग ४० कि.मी. प्रतितास ठेवणे आदी उपाययोजना केली जात असल्याचे सांगितले. तसेच वन्यप्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे हे वन्यप्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या शोधात स्थलांतर करीत असतात. या प्रक्रियेमुळे जैवविविधता समतोल साधला जातो. या प्रक्रियेदरम्यान मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.
...
विविध उपाययोजना
१. विभागाकडून रॅपिड रेस्क्यू युनिट, टीसीसी व हत्ती मागोवा दलासाठी ३६८ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठीचा प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
२. वन्यप्राण्याच्या हल्ल्यासंदर्भातील उत्तरात वन्यप्राणी गणनेनुसार राज्यात वाघांच्या एकूण संख्येपैकी २००हून अधिक वाघ हे चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. प्रायोगिक तत्त्वावर जुन्नर वन विभागातील पाच मादा बिबट्यांना जेरबंद करून त्यांची नसबंदी करण्याची परवानगी केंद्राने दिली असल्याने त्यावर कार्यवाही केली जात आहे.
३. हिंस्त्र प्राण्याचे मानवांवरील हल्ले कमी करण्यासाठी एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर काही ठिकाणी केला असल्याचेही वनमंत्र्यांनी आपल्या उत्तरात सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

