अर्थसंकल्पी सभेत पत्रकारांची गैरसोय

अर्थसंकल्पी सभेत पत्रकारांची गैरसोय

Published on

अंबरनाथ, ता. २६ (वार्ताहर) : २०२५-२६च्या अर्थसंकल्पी सभेदरम्यान अंबरनाथ नगर परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात पत्रकारांना भेडसावलेल्या गैरसोयीविरोधात बुधवारी (ता. २५) काळ्या फिती बांधून निषेध नोंदवण्यात आला. अंबरनाथ पत्रकार तालुका संघाच्या वतीने हा आंदोलनात्मक इशारा देण्यात आला.

नव्या सभागृहातील पत्रकार गॅलरीच्या रचनेत त्रुटी असल्याची तक्रार पत्रकारांनी केली आहे. गॅलरीतून कोणता नगरसेवक बोलत आहे, हे स्पष्ट दिसत नसल्याने कामकाज समजण्यात अडथळे येत आहेत. याशिवाय ध्वनीप्रणाली कोलमडलेली आहे. पत्रकार कक्षात स्वतंत्र स्पीकरची व्यवस्था नसल्याने अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या बैठकीचे अचूक वार्तांकन करताना अडचणी निर्माण झाल्या. ही यंत्रणा सुधारली जाईपर्यंत जुन्या इमारतीप्रमाणे नव्या सभागृहाच्या शेवटच्या रांगेत पत्रकारांना बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, काही नवोदित नगरसेवकांनी याला विरोध दर्शवल्याने वातावरण तंग झाले. त्याविरोधात पत्रकारांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवत नगराध्यक्षा तेजश्री करंजुळे पाटील यांना निवेदन दिले. तसेच नवोदित नगरसेवकांना संसदीय कामकाजाचे प्रशिक्षण देण्याची मागणीही करण्यात आली. पारदर्शक प्रशासनासाठी पत्रकारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही पालिकेची जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत, तांत्रिक उणिवा त्वरित दूर करण्याचा इशारा या आंदोलनातून देण्यात आला. या वेळी अध्यक्ष पंकज पाटील, वरिष्ठ पत्रकार युसुफ शेख, कमर काजी, चंद्रशेखर भुयार, सीझर लॉरेन्स, मयूरेश कडाव यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

सुरक्षिततेचा अभाव
हा प्रश्न केवळ सुविधांचा नसून सुरक्षिततेचाही असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणले. प्रेक्षक व अधिकारी गॅलरीतील काचा धोकादायक अवस्थेत आहे. केवळ अर्ध्या इंचाच्या लाकडी पट्टीवर आधारलेल्या आहेत. त्या कोसळल्यास लोकप्रतिनिधींना इजा होण्याची शक्यता आहे. सभागृहातील उंदरांचा सुळसुळाट, एसीमधील पाणीगळती, तसेच ऑपरेटर रूममध्ये एसी नसल्याने सर्व्हर बंद पडण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. शॉर्टसर्किटचा धोका लक्षात घेता तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अंबरनाथ : पत्रकारांनी काळ्या फिती बांधून नगराध्यक्षा तेजश्री करंजुळे पाटील यांना निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com