होलिकोत्सवात विश्वशांतीचा सुरेल जल्लोष

होलिकोत्सवात विश्वशांतीचा सुरेल जल्लोष

Published on

होलिकोत्सवात विश्वशांतीचा सुरेल जल्लोष
ठाण्यात संगीत-नृत्याची मेजवानी
ठाणे, ता. २६ (बातमीदार) : होलिकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात शास्त्रीय संगीत आणि नृत्याचा अद्वितीय संगम रंगणार आहे. नृत्यधारा कत्थक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित विश्वशांती संगीत-नृत्य समारोह यंदाही रसिकांसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे. या उपक्रमाची माहिती संस्थापिका आणि ज्येष्ठ कत्थक नृत्यांगना मुक्ता जोशी यांनी दिली.
मागील १३ वर्षांपासून विविध संकल्पनांवर आधारित हा समारोह सातत्याने आयोजित केला जात असून शास्त्रीय कला प्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे. यंदाचा कार्यक्रम रविवार (ता. १) सकाळी १०.३० वाजता गडकरी रंगायतन येथे होणार आहे. ‘ताल नर्तन’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात नृत्याच्या विविध छटा उलगडून दाखवण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या ‘नृत्यसृजन’ या विभागात डॉ. सुनील सुंकारा कत्थक सादर करणार असून डॉ. लता सुरेंद्र ‘कलाश्री’ भरतनाट्यमची नजाकत प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत. मीराबाईच्या प्रेमभावनेवर आधारित ‘प्रेमतरंग’ आणि विठुरायाच्या भक्तीचा ‘भक्तीरंग’ या सादरीकरणांमधून अध्यात्म आणि कलेचा संगम अनुभवायला मिळणार आहे.
समारंभाच्या उत्तरार्धात फ्युजन संगीताची खास मेजवानी रंगणार आहे. ढोलकीपटू कृष्णा मुसळे, पखवाज वादक रोहित खवले, कोजन वादक वैभव वावीकर, सितार वादक अपर्णा देवधर आणि हार्मोनियम वादक मिथिल गावडे यांच्या साथीत कत्थक आणि लावणीची जुगलबंदी सादर होणार आहे. या फ्युजन संकल्पनेची मांडणी मुक्ता जोशी यांनी केली आहे. याशिवाय यजमान संस्थेचे ज्येष्ठ कलाकार ‘नृत्य उत्सव’ सादर करणार आहेत. कार्यक्रमास खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला गायकवाड-पिंपळोकर, शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार आणि विभागप्रमुख अमित जैस्वाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम मोफत प्रवेश देण्यात येणार असून, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com