बेकायदा नळजोडण्यांवर एमआयडीसीचा हातोडा

बेकायदा नळजोडण्यांवर एमआयडीसीचा हातोडा

Published on

पाणीचोरांचे धाबे दणाणले
मलंग रोड परिसरात ३८ बेकायदा नळजोडण्या खंडित
डोंबिवली, ता. २६ ः कल्याण-मलंग रोड परिसरातील पाणीचोरीची गंभीर दखल घेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बुधवारी (ता. २५) धडक कारवाई केली. मुख्य जलवाहिन्यांवरून बेकायदा पाणी लांबवणाऱ्या नांदिवली आणि गायत्री चाळ परिसरातील तब्बल ३८ नळजोडण्यांवर एमआयडीसीने हातोडा फिरवला आहे.

बारवी धरणातून येणाऱ्या ‘कल्याण फिडर’ या मुख्य जलवाहिनीवरून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गुप्तपणे केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली. काही ठिकाणी मुख्य जलवाहिनीला वेल्डिंग यंत्राद्वारे छिद्र पाडून २४ तास पाणीउपसा केला जात होता. तसेच स्थानिक रहिवाशांसह गॅरेजचालक आणि काही आस्थापना या चोरीच्या पाण्यातून व्यवसाय करत होते. या प्रकारामुळे एमआयडीसीचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता आणि अधिकृत ग्राहकांना कमी दाबाने पाणी मिळत होते.

कारवाईमुळे पाणीचोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मलंग रोड परिसर हा बेकायदा बांधकामांसाठी ओळखला जातो, त्यामुळे ही मोहीम केवळ इथेच न थांबता आता काटई ते बदलापूर महामार्गावरील पाणीचोरीच्या अड्ड्यांवरही हातोडा पडण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. पाणीचोरी हा गुन्हा असून यापुढेही अशाच प्रकारची आकस्मिक आणि कठोर कारवाई सुरूच राहील, असे संकेत एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाने दिले आहेत.

पथकाचा बंदोबस्त
कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी एमआयडीसीने आपल्या विशेष कमांडो पथकासह सकाळीच कारवाईला सुरुवात केली. उपअभियंता, सहाय्यक अभियंता आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने मुख्य जलवाहिनीला जोडलेले २० ते ३० फुटांचे प्लॅस्टिकची वाहिनी उपसून काढण्यात आले. जप्त केलेले पाइप आणि इतर साहित्य एमआयडीसीच्या गोदामात जमा करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com