मुरबाडच्या राजकीय घडामोडींना वेग

मुरबाडच्या राजकीय घडामोडींना वेग

Published on

मुरबाड, ता. २६ (बातमीदार) : मुरबाड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष संतोष दिलीप चौधरी यांनी बुधवारी (ता. २५) सायंकाळी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. त्यांच्या या निर्णयामुळे मुरबाडमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे मानले जात आहे. राजीनाम्यानंतर गुरुवारी (ता. २६) नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेली नगर पंचायतीची विशेष सभा रद्द करण्यात आली. या संदर्भातील आदेश ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सायंकाळी उशिरा नगरपंचायतीला पाठविण्यात आला.
संतोष चौधरी यांची फेब्रुवारी २०२५ मध्ये भाजपच्या वतीने नगराध्यक्षपदी निवड झाली होती. नगर पंचायतीत एकूण १७ सदस्यांपैकी १२ सदस्यांचे बहुमत भाजपकडे होते. मात्र उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी आमदार किसन कथोरे यांनी शिवसेना उमेदवार नम्रता नितीन तेलवणे यांना उमेदवारी दिल्याने भाजपमधील काही सदस्य नाराज झाले. परिणामी, भाजपच्या नऊ नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेना उमेदवाराचा पराभव केला आणि भाजपच्या दिक्षिता वारघडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड केली.
या घडामोडीनंतर बंडखोर नगरसेवकांनी ‘परिवर्तन पॅनल’ स्थापन करत सत्ता समीकरणे बदलली होती. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत पाठिंबा दर्शविल्याची चर्चा होती. त्यानंतर राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला. आता संतोष चौधरी यांच्या राजीनाम्यामुळे हे प्रकरण नव्या टप्प्यात आले आहे.
राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी निवडला जाणारा नवा अध्यक्ष फक्त एका वर्षासाठीच पदावर राहणार आहे. फेब्रुवारी २०२७ मध्ये नगर पंचायतीची मुदत संपणार आहे. दरम्यान, नवीन नगराध्यक्ष निवडीनंतर उपनगराध्यक्ष दिक्षिता वारघडे यांच्याविरुद्धही अविश्वास ठराव दाखल होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


कथोरे विरुद्ध कपिल पाटील संघर्षाची पार्श्वभूमी
२०२२ च्या नगरपंचायत निवडणुकीपासून मुरबाड शहरात नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शहराध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी अर्ज भरला आणि विजय मिळविला. त्यांना अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद देण्यात आले होते. त्यानंतर संतोष चौधरी यांना नगराध्यक्षपद दिले. या काळात आमदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यातील राजकीय संघर्ष चर्चेत राहिला.
२०२६ मध्ये रामभाऊ दुधाळे यांनी आमदार कथोरे यांना आव्हान देत शिवसेनेचा उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत करून भाजपच्या उमेदवाराला विजयी केले होते.
२०२२च्या निवडणुकीत कपिल पाटील यांच्याशी जवळीक असलेल्या अधिकृत भाजप उमेदवार दीपिका खाटेघरे यांचा पराभव किसन कथोरे समर्थक दिक्षिता वारघडे यांनी अपक्ष म्हणून केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. मागील वर्षी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या बंडखोरीमुळे निर्माण झालेली दरी आता अधिकच वाढल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com