शिमगोत्सवासाठी एसटी सज्ज!
कोकणवासीयांच्या दिमतीला ‘लालपरी’
शिमगोत्सवासाठी ठाणे विभागातून ८९ विशेष बस
कल्याण, ता. २६ (बातमीदार) : कोकणचा सण आणि कोकणवासीयांची ओढ हे समीकरण लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने ‘होळी-शिमगोत्सवासाठी’ कंबर कसली आहे. यंदा जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी पाहता, ठाणे विभागातील विविध आगारांतून कोकणासाठी ८९ विशेष बसफेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
यंदा सोमवारी (२ मार्च) होळी असल्याने शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्यांची पर्वणी चाकरमान्यांना मिळाली आहे. रेल्वेचे आरक्षण अनेक महिने आधीच पूर्ण झाल्याने प्रवाशांनी एसटीच्या जादा गाड्यांना पसंती दिली आहे. खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी लूटमार टाळण्यासाठी ‘लालपरी’चा हा पर्याय प्रवाशांसाठी दिलासादायक ठरत आहे. जादा गाड्या प्रामुख्याने सकाळी ५ ते ७ आणि रात्री ८ नंतरच्या वेळेत सुटतील. विशेष म्हणजे, ज्या मंडळांनी किंवा प्रवाशांच्या गटाने ‘ग्रुप बुकिंग’ केले आहे, त्यांच्यासाठी त्यांच्या निवासाच्या ठिकाणाहून बस सोडण्याची सोय एसटीने केली आहे. यामुळे प्रवाशांना बॅगा घेऊन स्थानकापर्यंत येण्याचा त्रास वाचणार आहे.
सुरक्षित प्रवासाचे आवाहन
खासगी वाहनांच्या अवाजवी भाडेवाढीला आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी एसटीने हे नियोजन केले आहे. प्रवाशांनी अधिकृत आरक्षण केंद्रांवरून किंवा ऑनलाइन पद्धतीने आपले तिकीट निश्चित करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
फेऱ्यांचे वेळापत्रक
आगार/स्थानक २८ फेब्रु १ मार्च २ मार्च एकूण फेऱ्या
ठाणे १२ ११ ०४ २७
विठ्ठलवाडी ०९ ११ ०३ २३
कल्याण ०४ ०७ ०६ १७
बोरिवली १० ०५ ०१ १६
भाईंदर ०२ ०२ ०२ ०६
एकूण ३७ ३६ १६ ८९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

