खासगी रुग्णालयांत सरकारी योजनांची सक्ती करावी
तुर्भे, ता. २६ (बातमीदार) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात धर्मादाय रुग्णालयात सरकारी योजनांची अंमलबजावणी सक्तीची केली आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबईतील धर्मादायसह खासगी रुग्णालयांतदेखील सरकारी योजना अनिवार्य करावी. यामुळे गोरगरीब व गरजू रुग्णांना फायदा होईल, अशी मागणी नगरसेवक गणेश सकपाळ यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी वनमंत्री गणेश नाईक, महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ. कैलास शिंदे व पालिका सभागृह नेते सागर नाईक यांना निवेदन दिले आहे.
धर्मादाय आणि खासगी रुग्णालयांत दिल्या जाणाऱ्या सुविधांचा दर हा सारखाच असला पाहिजे. तसेच दोन्हीही प्रकारच्या रुग्णालयात दरपत्रक रुग्णालयाच्या प्रथम दर्शनी भागात प्रसिद्ध करणे अत्यंत गरजेचे आहे. जे रुग्णालयात वैद्यकीय समाजसेवक असतात, त्यांना शासकीय योजनांसंदर्भात अपेक्षित माहिती नसते. त्यामुळे रुग्ण शासकीय योजनांपासून वंचित राहतात. म्हणून त्यांना सरकारने प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. तसेच अनेक धर्मादाय रुग्णालयांत दाखल होण्यासाठी रुग्ण येतात, परंतु त्यांना थेट त्याच रुग्णालयातील खासगी रुग्णालयात दाखल करतात. यामुळे आर्थिक लूटमार होते. म्हणून प्रथम रुग्ण आल्यावर त्यांना उपचाराची माहिती देऊन शासकीय योजना घ्यायची आहे की नाही, याबाबत अर्ज भरून घ्यावा. त्यांनी जर ती योजना नाकारली, तर खासगी रुग्णालयात दाखल करून घ्या, परंतु रुग्णाला पूर्ण माहिती देणे गरजेचे असून, ही प्रकिया अनिवार्य करावे, असाही उल्लेख निवेदनात केला आहे.
सरकारने सर्वसामान्य रुग्णांसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्याचा फायदा त्यांना होत नाही. गरीब रुग्णांना फायदा व्हावा, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून गणेश नाईक यांच्याकडे मागणी केली आहे, असे नगरसेवक गणेश सकपाळ यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

