

जुईनगर, ता. २६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनधिकृत बांधकामांवरील तीन पट शास्ती कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र ‘स्वतःचं घर पेटवायचं आणि स्वतःच पाणी घेऊन धावायचं’ अशा प्रकारचा प्रकार सुरू असल्याची उपरोधिक टीका माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी केली आहे. ठाणे महापालिकेच्या धर्तीवर अभय योजना राबवून सरसकट घरपट्टी आणि पाणीपट्टी या लोकांना दिल्यास पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल, असेही ते म्हणाले.
ज्यांनी कर लादला, तेच आता तो रद्द केल्याचे श्रेय घेत आहेत, म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ म्हणाव्या लागतील, अशा भाषेत त्यांनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. आपणच लावलेला कर आपणच कमी केल्याने सत्ताधाऱ्यांनी काय तीर मारला, असा प्रश्न विचारत, पूर्वी सत्तेत असताना सर्वसाधारण सभेत हा तीन पट शास्ती कर आम्ही विरोध करत असताना सत्ताधाऱ्यांनी बहुमताने मंजूर केला. आतासुद्धा केवळ शास्ती रद्द झाली असून तीन पट कर आकारणी रद्द केली नाही. या प्रकारामुळे ७० टक्के लोकांकडे घरपट्टी नसून याउलट तो एक पट केल्यास अनेक गरजेपोटी बांधलेले घरमालक घरपट्टी भरतील. या जाचक करामुळे अनेकांकडे मालमत्ता कर नाही आहे. फक्त शास्ती रद्द न करता कर कमी करून लोकांना रीतसर घरपट्टी द्या. गावठाणातील सर्वे करून पाणीपट्टी व घरपट्टी नसणाऱ्या प्रकलग्रस्तांना कर पावत्या द्या, जेणेकरून प्रशासनाचा फायदा होईल, असे त्यांनी म्हटले.
गरजेपोटी बांधलेल्या घरांचा सर्वे करून त्यांना मालमत्ता कर आकारून पालिकेच्या तिजोरीत वाढ करायची सोडून तीन पट शास्ती एक पट केल्याचा गाजावाजा सत्ताधारी करीत असल्याचेही वास्कर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.