मुरूड आगारातील सीएनजी पंपाचा प्रस्ताव रखडला

मुरूड आगारातील सीएनजी पंपाचा प्रस्ताव रखडला

Published on

मुरूड आगारातील सीएनजी पंपाचा प्रस्ताव रखडला; बससेवेचे वेळापत्रक विस्कळित
अलिबागला गॅस भरण्यामुळे प्रवाशांचा खोळंबा, पर्यटनस्थळ असूनही मूलभूत सुविधांचा अभाव

मुरूड, ता. २६ (बातमीदार) : मुरूड एसटी आगारात सीएनजी गॅस पंप उभारण्याचा प्रस्ताव महानगर गॅस कंपनीकडून नामंजूर झाल्याने आगारातील बससेवेचे वेळापत्रक विस्कळित होत असून, प्रवाशांना वारंवार विलंबाचा सामना करावा लागत आहे. आगारातील सुमारे ३० बस सीएनजीवर धावत असल्याने त्यांना गॅस भरण्यासाठी अलिबाग किंवा अन्यत्र जावे लागत असून, प्रत्येक फेरीत किमान अर्धा तास विलंब होत आहे. परिणामी मुंबई-पुणे मार्गावरील प्रवाशांचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

ऐतिहासिक जंजिरा किल्ला, समुद्रकिनारे व निसर्गसौंदर्यामुळे राज्यातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र ठरलेल्या मुरूडमध्ये एसटी सेवेवर मोठ्या प्रमाणावर पर्यटक अवलंबून असतात. मात्र, गॅस भरण्यासाठी होणाऱ्या अतिरिक्त थांब्यामुळे वेळेचे नियोजन बिघडत असून, काही प्रवासी अलिबागपर्यंतच तिकीट काढून पुढील प्रवासासाठी पर्यायी बसचा पर्याय निवडत आहेत. याचा थेट परिणाम मुरूड आगाराच्या उत्पन्नावर होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यासंदर्भात पेण विभागीय नियंत्रक चौरे यांनी महानगर गॅस कंपनीकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती देत, ३० बससाठी स्वतंत्र पंप देणे शक्य नसल्याचे कारण देत तो नाकारण्यात आल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, जिल्ह्यातील इतर आगारांना मंजुरी मिळत असताना मुरूडचा प्रस्ताव नाकारला गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. मुरूडला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्याच्या घोषणांबरोबरच मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची मागणी होत असून, खासदार सुनील तटकरे व आमदार महेंद्र दळवी यांनी या प्रश्नात लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चौकट
आगाराच्या उत्पन्नावर परिणाम :
सीएनजी भरण्यासाठी बसना अलिबागपर्यंतच प्रवास करावा लागत असल्याने अनेक प्रवासी तेवढ्याच अंतराचे तिकीट काढतात. पुढील प्रवासासाठी दुसरी बस पकडली जात असल्यामुळे मुरूड आगाराच्या उत्पन्नात घट होत असून, दीर्घकालीन आर्थिक परिणामांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com