घोडबंदरमध्ये नवीन बांधकामाला विरोध

घोडबंदरमध्ये नवीन बांधकामाला विरोध
Published on

घोडबंदरमध्ये नवीन बांधकामाला विरोध
पाणीटंचाईवरून भाजप आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
​ठाणे, ता. २६ : घोडबंदर रोड परिसरातील तीव्र पाणीटंचाई आणि नागरिकांचा वाढता संताप लक्षात घेता, महापालिकेने या भागात नव्या गृहनिर्माण प्रकल्पांना आणि इमारतींच्या बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी आक्रमक मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र दिले असून, सद्यस्थितीत राहणाऱ्या नागरिकांचे हित जपण्यासाठी हा कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

घोडबंदर रोड परिसराची लोकसंख्या आता पाच लाखांच्या घरात पोहोचली आहे. ठाणे महापालिकेच्या तिजोरीत सर्वाधिक मालमत्ता कर हा माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधून जमा होतो; मात्र त्या बदल्यात नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा अत्यंत तोकड्या आहेत. विशेषतः पाणी आणि वाहतूक कोंडी या दोन समस्यांनी नागरिकांचे जगणे कठीण केले असल्याचे डुंबरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

नागरिकांच्या उद्रेकाची भीती
​उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच घोडबंदरमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पावसाळ्याला अद्याप तीन महिने उरले असून, पाणी मिळाले नाही तर नागरिकांच्या संयमाचा बांध फुटून मोठा उद्रेक होण्याची शक्यता डुंबरे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नवीन बांधकामांवर निर्बंध घालावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

​लाखांची पाणी बिले
अनेक गृहसंकुलांना दरमहा लाखो रुपये खर्चून टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. महापालिकेकडून पाणीपट्टी वसूल केली जात असतानाही नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. ५० ते १०० दशलक्ष लिटर जादा पाणी देण्याचे आश्वासन प्रशासनाने वारंवार दिले; मात्र परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

महापालिकेने भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून पाण्याचे नियोजन केलेले नाही. स्वतःच्या धरणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अशा स्थितीत नव्या इमारतींना परवानगी देणे म्हणजे नवीन रहिवाशांची फसवणूक करणेच आहे. जोपर्यंत जुन्या रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही, तोपर्यंत नवीन बांधकामांना मज्जाव करावा.
- मनोहर डुंबरे, ज्येष्ठ नगरसेवक, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com