खारघर–कामोठे कोस्टल रोडची मागणी

खारघर–कामोठे कोस्टल रोडची मागणी

Published on

खारघर-कामोठे कोस्टल रोडची मागणी
वाढत्या लोकवस्ती आणि वाहतुकीमुळे रस्त्याचा ताण वाढणार
पनवेल, ता. २६ (बातमीदार) : पनवेल-सायन महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न तीव्र होत असताना सिडकोकडून बेलापूर ते खारघरदरम्यान उभारण्यात येणारा प्रस्तावित कोस्टल रोड कामोठेपर्यंत वाढवावा, अशी मागणी कामोठे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेऊन निवेदन दिले असून, तांत्रिक बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.
दक्षिण नवी मुंबईतील खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल तसेच नैना क्षेत्रात झपाट्याने वाढणारी लोकवस्ती आणि त्यासोबत वाढलेली वाहतूक यामुळे पनवेल-सायन महामार्गावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथे नोकरी-व्यवसायासाठी दररोज हजारो नागरिक या मार्गावरून प्रवास करतात. याशिवाय घाटमाथा व कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही हाच प्रमुख मार्ग असल्याने कोंडी अधिकच तीव्र होत आहे. कळंबोली ते बेलापूर तसेच खारघर ते कामोठेदरम्यान सर्व्हिस रोड नसल्याने स्थानिक वाहतुकीलाही महामार्गावरच अवलंबून राहावे लागत आहे.
लवकरच सुरू होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागातील वाहतुकीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नैना प्रकल्प, पुष्पक नगरसारख्या नव्या वसाहती विकसित होत असल्याने भविष्यातील वाहतुकीचा विचार करून पर्यायी मार्ग उभारणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. कोस्टल रोड कामोठेपर्यंत वाढविल्यास स्थानिकांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होऊन प्रवास जलद व सुरक्षित होईल, तसेच महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा दावा गायकवाड यांनी केला आहे.
कामोठे-खारघर यादरम्यान मॅंग्रोव्ह क्षेत्र असल्याने पर्यावरणीय अडथळ्यांची शक्यता असली तरी संरक्षित उड्डाणपूल किंवा पर्यायी तांत्रिक मार्गाचा पर्याय वापरून विकास साधता येऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

चौकट
विमानतळामुळे पर्यायी मार्गाची आवश्यकता
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर दक्षिण नवी मुंबईत प्रवासी व मालवाहतुकीची मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. सध्याच पनवेल-सायन महामार्ग क्षमतेच्या उंबरठ्यावर असून, भविष्यातील वाढीव वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग आवश्यक आहे. कोस्टल रोड कामोठेपर्यंत वाढविल्यास विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र दुवा निर्माण होऊन कोंडी कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com