विक्रोळी स्थानकाच्या छताला पोकलेन मशीनची धडक

विक्रोळी स्थानकाच्या छताला पोकलेन मशीनची धडक

Published on

विक्रोळी स्थानकाच्या छताला पोकलेन मशीनची धडक
लोकल सेवा विस्कळित; प्रवाशांना मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकात पोकलेन मशीनने प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील छताला धडक दिल्याची घटना गुरुवारी (ता. २६) पहाटे घडली. या धडकेमुळे प्लॅटफॉर्मचा काही भाग असुरक्षित झाल्याने रेल्वे प्रशासनाने तातडीने ओव्हरहेड वायरमधील विद्युत पुरवठा खंडित केला. परिणामी, डाऊन मार्गावरील उपनगरी लोकल सेवा काही काळ विस्कळित झाली आणि सकाळच्या गर्दीच्या वेळेत कामावर जाणाऱ्या लाखो मुंबईकरांना लेटमार्क लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी पहाटे ५च्या सुमारास घडली. स्थानक परिसरात सुरू असलेल्या कामादरम्यान पोकलेन मशीनचा काही भाग प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील छताला धडकला. धडकेमुळे छताच्या संरचनेवर परिणाम झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पहाटे ५.०५ ते ५.४५ या कालावधीत डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला. यादरम्यान ओव्हरहेड वायरमधील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर प्लॅटफॉर्मची पाहणी, दुरुस्ती आणि सुरक्षिततेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर प्लॅटफॉर्म सुरक्षित घोषित करून सेवा पुन्हा सुरू करण्यात आली; मात्र तोपर्यंत उपनगरी लोकल सेवांचे वेळापत्रक विस्कळित झाले होते.
...
तीन लोकल अडकल्या
ब्लॉकदरम्यान माटुंगा ते विक्रोळी यादरम्यान डाऊन मार्गावर तीन लोकल रखडून पडल्या होत्या. तसेच ठाणे आणि कल्याणकडे जाणाऱ्या काही लोकल गाड्या डाऊन जलद मार्गावर वळविण्यात आल्या. या बदलांमुळे अनेक गाड्या उशिरा धावू लागल्या आणि त्याचा परिणाम पुढील फेऱ्यांवरही झाला.
...
गर्दीत प्रवाशांची गैरसोय
सुमारे पाऊण तास विक्रोळी स्थानकाचा प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद ठेवण्यात आल्याने सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अनेक लोकल गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना लेटमार्कचा सामना करावा लागला. काही स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दीही पाहायला मिळाली. या घटनेचा परिणाम १० वाजेपर्यंत जाणवत होता. दरम्यान, घटनेची चौकशी सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com