उन्नत मार्गाचे स्वप्न सत्यात!

उन्नत मार्गाचे स्वप्न सत्यात!

Published on

वाशी, ता. २६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते; पण माती परीक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता खांब उभारण्याचे काम सुरू झाले आहे. २०२७ अखेरपर्यंत हा मार्ग पूर्ण होण्याची शक्यता महापालिकेच्या अभियंता विभागाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे १५ वर्षांपासून रखडलेला पूल मार्गी लागणार असल्याने नवी मुंबईकरांना वाहतुकीच्या समस्येपासून दिलासा मिळणार आहे.

सिडकोने नवी मुंबई शहर बसविताना बेलापूर ते ऐरोली असा २१.१५ किमीचा पाम बीच रस्ता नियोजित केलेला होता; परंतु १९.२० किमीचा रस्ता सिडकोने २००९ मध्ये घणसोलीपर्यंत पूर्ण केला. त्या पुढील भागात कांदळवन असल्याने पर्यावरण विभाग व इतर प्राधिकरणांची मंजुरी मिळत नसल्याने १.९४ किमी लांबीचा केवळ पूल बांधण्याचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेने मांडला. या प्रकल्पासाठी ८०० कोटी खर्च अपेक्षित असल्याने एवढा मोठा खर्च महापालिका पेलू न शकल्याने तो प्रस्ताव रद्द करण्यात आला होता.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी या कामाला गती देण्याचे प्रशासनाला आदेश दिले. त्यानंतर २०१७ मध्ये नवी मुंबई महापालिकेने जुन्या प्रस्तावाप्रमाणे १.९४ किमीचा पूल ३.२ किमी लांबीचा प्रस्ताव बनवला. हा पूल मुलुंड-एरोली टोल मार्गावरच्या एमएमआरडीएकडून बांधण्यात येत असलेल्या ऐरोली-काटई या पुलाला जोडण्याचा प्रस्थापित केला. या पुलासाठी ३७२ कोटी खर्च अपेक्षित होता. त्यानंतर कांदळवन, पर्यावरण विभाग, उच्च न्यायालयात असलेली याचिका अशा विविध अडचणींत ऐरोली-घणसोली उन्नत मार्ग अडकला होता.

सप्टेंबरपर्यंत मुदत
दोन वर्षांपूर्वी महापालिकेने कंत्राटदाराला कार्यादेश दिला होता; पण पर्यावरण विभागाकडून अडथळा निर्माण झाला होता. आता पर्यावरण विभागाची बाधा दूर झाली, तसेच माती परीक्षणाचे काम पूर्ण झाले असून आता खांब उभारण्याच्या कामाला गती आली आहे. सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत पालिकेने ठेकेदाराला दिली आहे, तर पालिकेकडून ५५० कोटी या उड्डाणपुलासाठी खर्च करण्यात येणार आहे. सिडको व महापालिका मिळून हा खर्च करणार आहे.

प्रवाशांचा सुखकर प्रवास
ऐरोली-घणसोली उन्नत मार्गामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली व एमआयडीसी क्षेत्रातील रहदारी सुरळीत होणार आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबई, ठाणे, कल्याण, तसेच डोंबिवलीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी जलद गतीने उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी होणाऱ्या कोंडीचा सामना नागरिकांना आता होणार नाही. त्यांचा प्रवास या उड्डाणपुलामुळे सुखकर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com