बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण
बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण
हर्षवर्धन सपकाळ भेटीला
पेण, ता. २७ (वार्ताहर) : मागील १६ वर्षांपासून रखडलेल्या पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्ताचा सातबारा कोरा करून तो मूळ मालकांना परत करा, यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी आजपासून प्रांत कार्यालय येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट देऊन सांगितले, की बाळगंगा धरण प्रकल्प हा येथील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असेल आणि पुनर्वसनाचे नियम डावलून धरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा शासन, प्रशासन प्रयत्न असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. पुनर्वसनाचे जे नियम आहेत ते डावलून प्रक्रिया होत असेल तर ते चुकीचे आहे. काँग्रेस पक्ष प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठाम उभा असून याबाबत अधिवेशनात आवाज उठविला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सरकारने तत्काळ पूर्तता करावी, असे आवाहनही सपकाळ यांनी केले. ‘ज्या शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनी पाच वर्षांच्या आत वापरात आल्या नाहीतर त्या मालकांच्या नावे सातबारा कोरा करून परत कराव्यात,, ही मागणी आम्ही या उपोषणादरम्यान लावून धरल्याचे उपोषणकर्ते संदीप पाटील यांनी सांगितले. या वेळी प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे, शेकापचे खजिनदार अतुल म्हात्रे, पेण तालुकाप्रमुख अशोक मोकल, काँग्रेस महिला उपाध्यक्षा राणी अग्रवाल, बळीराम भोईर, राजेंद्र म्हात्रे, राजेंद्र झेमसे, श्रुती म्हात्रे यांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शविला.

