पालिकेच्या अभियंत्यांच्या भरतीप्रक्रियेचा निपटारा करा
अभियंत्यांच्या भरती प्रक्रियेचा निपटारा करा
महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई, ता. २७ ः पालिकेच्या दुय्यम अभियंता भरती प्रक्रियेत, छाननी प्रक्रियेत अपात्र, अनुपस्थित उमेदवारांमुळे ज्या जागा रिक्त आहेत, त्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय कार्यवाही वेगाने करावी, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाला दिले आहेत. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी घेऊन लवकर निपटारा करावा, असेही महापौरांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिकेच्या नगर अभियंता विभागअंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत) या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षा झाली. तरी न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. याप्रकरणी अंतिम सुनावणी लवकर घेण्याबाबत न्यायालयास विनंती करावी, योग्य ती बाजू खंबीरपणे मांडावी, असे निर्देश महापौर रितू तावडे यांनी प्रशासनास दिले आहेत.
पालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता संवर्गातील भरतीसंदर्भात प्रलंबित बाबींच्या अनुषंगाने, महापौर रितू तावडे यांनी पालिका मुख्यालयातील महापौर दालनात शुक्रवारी बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी हे निर्देश दिले.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, नगर अभियंता रामचंद्र कदम, कायदा अधिकारी कोमल पंजाबी, संयुक्त कायदा अधिकारी सुखश्री मोदले, इतर संबंधित अधिकारी तसेच म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश भुतेकर-देशमुख यांच्यासह भरती प्रक्रियेतील उमेदवारांचे निवडक प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.
-------

