वसंत आबाजी डहाके
मराठी भाषा आणि संस्कृतीवर ठाम राहून इतर भाषा अवगत कराव्यात
ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः आजवरच्या अनेक संतांनी, साहित्यिकांनी त्यांच्या साहित्यातून मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीला संपन्न आणि समृद्ध करण्याचे कार्य केले आहे. इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. मात्र, आपल्या मुलांनी, तरुणांनी मराठी भाषा विसरता कामा नये. मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीवर ठाम राहून इतर भाषा अवगत कराव्यात, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.
कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीने पालिका मुख्यालयातील सभागृहात ‘मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा पंधरवडा’ कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई महापालिका मुख्यालयातील सभागृहात हा सोहळा पार पडला. महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि विविध समित्यांचे अध्यक्ष, गटनेते, नगरसेवक यावेळी उपस्थित होते. तसेच, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी पालिकेचे अधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिका प्रभा गणोरकर आदी उपस्थित होते.
मराठी भाषेचे वैभव पाहायचे असेल तर एकदा तरी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरी’ प्रत्येकाने वाचायला हवी. मराठी भाषेचा अवकाश किती मोठे आहे हे ज्ञानेश्वरीच्या एकेका शब्दातून कळते, असे स्पष्ट करून डहाके म्हणाले की, अनेक जाती-धर्मांचे संत झाले. पण, त्यांनी त्यांच्या अभंगातून मराठी भाषेला संपन्न आणि समृद्ध करण्याचे कार्य केले. आपली मराठी भाषेशी नाळ जुळलेली आहे. याचा अर्थ अन्य भाषा अवगत करण्याची गरज नाही, असा होत नाही. जगभरातील काम, संपर्क, ज्ञान आदींसाठी एक भाषा आवश्यक असते. पण, ती अवगत करत असताना आपण मराठी भाषेपासून दूर जाता कामा नये. आपण आपली भाषा आणि संस्कृतीवर ठाम राहून इतर भाषा अवगत करायला हव्यात. भाषेचा प्रवास कायमच होत असतो. भाषा एकमेकांना जोडणारा पूल आहे. मराठी भाषा ही वैभवसंपन्न असून ही संपन्नता कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे, असे आवाहन देखील डहाके यांनी केले.
महापौर तावडे यांचे आवाहन
मराठी भाषेचा जागर करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबवले जातात. प्रत्येकांनी मराठी भाषेत व्यवहार करावेत. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नगरसेवक, अधिकारी व नागरिकांनी मराठी भाषा पंधरवाड्यानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी यावेळी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

