‘एमपीसीबी’चे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग निलंबित
‘एमपीसीबी’चे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग निलंबित
विधानसभेच्या कामकाजाला गृहीत धरणे पडले महागात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : विधानसभेच्या कामकाजाला तसेच मंत्र्यांना गृहीत धरणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग यांना महागात पडले आहे. २६ फेब्रुवारीला विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने राज्य सरकारने एम. देवेंद्र सिंग यांना निलंबित केले आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी (ता. २७) निलंबनाचे आदेश
काढले आहेत.
गुरुवारी (ता. २६) विधानसभेत राजुरा विधानसभेतील प्रदूषणाच्या प्रश्नावर अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी बोलावले असता त्यांनी स्पष्ट नकार दिला, असे हे विधान सभागृहात सांगितले. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सांगत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सिंग यांच्यावर कारवाईची मागणी केली. या वेळी तालिका सभापती दिलीप लांडे यांनी त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले.
मुनगंटीवार यांनी मांडला हक्कभंग
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत एम. देवेंद्र सिंग यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘विधानसभागृह हे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठीचे सर्वोच्च व सर्वभौम व्यासपीठ आहे. अशा पवित्र सभागृहात मांडण्यात आलेल्या लोकहिताच्या विषयावर उत्तर देण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना ब्रिफिंगसाठी उपस्थित राहण्यास नकार देणे हा केवळ प्रशासनिक निष्काळजीपणा नसून विधानसभेच्या अधिकार व विशेषाधिकारांचा अवमान करणारी गंभीर बाब आहे. मंत्री महोदयांना विषयावरील संपूर्ण माहिती उपलब्ध करून देणे ही संबंधित अधिकाऱ्यांची वैधानिक व प्रशासकीय जबाबदारी आहे. त्या कर्तव्यात कसूर करून अप्रत्यक्षपणे विधानसभेच्या कार्यात अडथळा निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे ही कृती सभागृहाच्या विशेषाधिकारांचा भंग आहे.त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

