महा आवास अभियानात पालघर जिल्ह्याची सलग तीन वर्षे दमदार कामगिरी

महा आवास अभियानात पालघर जिल्ह्याची सलग तीन वर्षे दमदार कामगिरी

Published on

महाआवास अभियानात पालघर जिल्ह्याची सलग तीन वर्षे दमदार कामगिरी
विविध गटांत विभागस्तरीय क्रमांक

पालघर, ता. २८ (बातमीदार) : महाआवास अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत आवास योजना प्रभावीपणे राबवत पालघर जिल्ह्याने २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या तीन वर्षांत विभागस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध गटांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत जिल्ह्याने कोकण विभागात आपली छाप कायम राखली आहे.
रविवार (ता. २२) सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे आयोजित कोकण विभागीय पुरस्कार वितरण सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पालघर जिल्ह्याचा गौरव करण्यात आला. या यशाबद्दल जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.
या सोहळ्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, भानुदास पालवे तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारले. या वेळी अतिरिक्त आयुक्त (विकास) डॉ. माणिक दिवे, ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ. राजाराम दिघे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रदीप घोरपडे व प्रसिद्ध वक्ते प्रशांत देशमुख उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आनंद व्यक्त करत सांगितले, की महाआवास अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सन्मानाने निवारा उपलब्ध झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या समन्वयातून हे यश शक्य झाले असून पुढील काळातही अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही नियोजनबद्ध अंमलबजावणी, सातत्यपूर्ण आढावा व तळागाळातील समन्वयामुळे हे यश मिळाल्याचे सांगत पुढील काळात गुणवत्ता कायम राखण्याचा निर्धार व्यक्त केला.
--------
सलग तीन वर्षांच्या या यशामुळे कोकण विभागात पालघर जिल्ह्याची मान उंचावली असून जिल्हा परिषद प्रशासन, पंचायत समित्या, ग्रामपंचायती तसेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

वर्षनिहाय कामगिरी

२०२१-२२
प्रधानमंत्री आवास योजना : सर्वोत्तम जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद पालघरने तृतीय क्रमांक, तर राज्य पुरस्कृत आवास योजना - सर्वोत्तम जिल्हा परिषद गटात द्वितीय क्रमांक मिळविला.

२०२२-२३
राज्य पुरस्कृत आवास योजना : सर्वोत्तम जिल्हा परिषद गटात तृतीय क्रमांक पटकावला. पंचायत समिती व ग्रामपंचायत गटातही उद्दिष्टपूर्ती, गती व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीच्या जोरावर मानांकन मिळाले. वाळू उपलब्धता गटात जव्हारचे तहसीलदार प्रथम क्रमांकावर राहिले.

२०२३-२४
या वर्षी जिल्ह्याने उल्लेखनीय झेप घेत प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वोत्तम जिल्हा परिषद गटात प्रथम क्रमांक पटकावला. पंचायत समिती गटात विक्रमगड प्रथम, वाडा द्वितीय व पालघर तृतीय क्रमांकावर राहिले. ग्रामपंचायत गटात मोज प्रथम व खुडेद द्वितीय ठरली. राज्य पुरस्कृत आवास योजना : सर्वोत्तम जिल्हा परिषद गटातही प्रथम क्रमांक मिळवत वाडा पंचायत समितीने प्रथम स्थान मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com