कर्जतमध्ये पोलीस मित्र संघटनेचे आंदोलन
कर्जतमध्ये पोलिस मित्र संघटनेचे आंदोलन
आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित
कर्जत, ता. २८ (बातमीदार) : कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील कथित भ्रष्ट कारभार, नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्या तसेच नगर परिषद हद्दीतील नागरी सुविधांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ पोलिस मित्र संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा भाग म्हणून संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी बुधवारी (ता. २५) लोकमान्य टिळक चौक येथे साखळी उपोषण सुरू केले होते. तिसऱ्या दिवशी प्रशासनाकडून आश्वासने मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना औषधे उपलब्ध नसल्याचे कारण देत बाहेरून औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच आदिवासी महिला बेबी वाघमारे गौरकामथ यांची सामान्य प्रसूती झाल्यानंतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आणि वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना फिटनेस सर्टिफिकेट देताना जावक क्रमांक न टाकता फसवणूक होत असल्याचा आरोपही करण्यात आला. ऑक्टोबर २०२५ मध्ये उपजिल्हा रुग्णालयातील औषधे खासगी दवाखान्यात आढळून आल्याच्या प्रकरणात नेमकी काय कारवाई झाली, याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशीही मागणी रमेश कदम यांनी केली. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपनगराध्यक्ष संतोष पाटील, सहकारी नगरसेवक तसेच नगर परिषदेचे अधीक्षक रवी लाड व त्यांच्या पथकाने तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक अडकमोड आणि सविता पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत चर्चेनंतर मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यानंतर सर्वांच्या संमतीने रमेश कदम यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र, प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास पुढील काळात पुन्हा उपोषण सुरू करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
याचबरोबर कर्जत नगर परिषदेकडील नागरी समस्यांकडे लक्ष वेधत शहरातील नाट्यगृहाची दयनीय अवस्था, अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे, गृहनिर्माण संस्थांतील पार्किंग जागांवरील अतिक्रमण, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता व पाणीपुरवठा, महिलांसाठी स्वतंत्र शौचालयांची उभारणी तसेच भाजीपाला व फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र बाजार व्यवस्था करण्याच्या मागण्या आंदोलनातून मांडण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

