धूलिवंदनला कायद्याचा कडक पहारा

धूलिवंदनला कायद्याचा कडक पहारा

Published on

उल्हासनगर, ता. १ (वार्ताहर) : शहरात होळी आणि धूलिवंदनाचा उत्साह शिगेला पोहोचत असतानाच, या सणाच्या आड समाजकंटकांकडून होणाऱ्या गैरवर्तनाला चाप बसावा, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. ‘सणाचा रंग आनंदाचा आणि सन्मानाचा असावा, गुन्ह्याचा नाही’, असा स्पष्ट संदेश देत पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी नागरिकांना जबाबदारीने सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे. महिलांची सुरक्षितता, सार्वजनिक सुव्यवस्था आणि कायद्याचा आदर राखण्यासाठी शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
होळी आणि धूलिवंदन हे आनंद, रंग आणि आपुलकीचे सण असले तरी काही समाजकंटक या सणांचा गैरवापर करून महिला, तरुणी व नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी उल्हासनगर पोलिसांनी यंदा विशेष खबरदारी घेतली आहे. पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी स्पष्ट सांगितले की, सणाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन, छेडछाड किंवा दहशत निर्माण करणाऱ्या कृती सहन केल्या जाणार नाहीत.
उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरात दोन सहाय्यक पोलिस आयुक्त, ७० पोलिस अधिकारी आणि ६०० पोलिस कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. शाळा-महाविद्यालय परिसर, बाजारपेठा, महिला वसतीगृहे तसेच संवेदनशील भागांमध्ये विशेष गस्त वाढवण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही सतत नजर ठेवली जाणार आहे. गुप्त पोलिस पथकेही कार्यरत राहणार आहेत.

होळी आणि धूलिवंदन हे आनंद, उत्साह आणि बंधुभाव वाढवणारे सण आहेत. सणाच्या नावाखाली कोणालाही त्रास देणे, जबरदस्तीने रंग लावणे, पाणी फुगे फेकून महिलांमध्ये भीती निर्माण करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे हे गंभीर गुन्हे आहेत. उल्हासनगर पोलिस अशा प्रकारांना अजिबात सहन करणार नाहीत. शहरातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता आमची प्राथमिक जबाबदारी आहे.
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ४

११२ क्रमांकावर संपर्क साधावा
सण साजरे करताना कोणत्याही प्रकारचा त्रास, गैरवर्तन किंवा संशयास्पद घटना घडल्यास तत्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘सणांचा आनंद घ्या, पण जबाबदारीने!’ हा संदेश देत उल्हासनगर पोलिस सणाच्या काळात पूर्ण सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com