हळद, पालक, बीटच्या मिश्रणातून बनवला नैसर्गिक रंग
हळद, पालक, बीटच्या मिश्रणातून नैसर्गिक रंग
विद्यार्थ्यांच्या पर्यावरणपूरक होळीचा प्रेरणादायी संदेश
घाटकोपर, ता. २८ (बातमीदार) ः होळी म्हणजे रंगांचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण. मात्र, रासायनिक रंगांमुळे त्वचा, डोळे आणि पर्यावरणाला होणारा अपाय होतो. हे लक्षात घेता विक्रोळी पार्कसाईट येथील विवेक विद्यालयामधील विद्यार्थ्यांनी यंदाची होळी अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचा संकल्प केला. यानिमित्त शाळेत नैसर्गिक रंगनिर्मितीची विशेष कार्यशाळा उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मैदा व मक्याचे पीठ यामध्ये पालक, बीट, हळद, झेंडूची फुले, जास्वंदाची फुले आदी नैसर्गिक घटकांचे मिश्रण करून विविध आकर्षक रंग तयार केले. पालकापासून हिरवा, बीटपासून गुलाबी, हळदीपासून पिवळा, तर फुलांपासून केशरी व लालसर रंग तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांनी केवळ रंग तयार केले नाहीत, तर त्यांच्या सुरक्षित वापराबाबतही माहिती जाणून घेतली.
कार्यशाळेदरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगितले. रासायनिक रंगांच्या दुष्परिणामांबाबत माहिती देत सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सर्जनशीलता पाहून वातावरण आनंदमय झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक विवेक थोरात यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आज केवळ रंग तयार केले नाहीत, तर समाजाला पर्यावरणपूरक विचारांची नवी दिशा दिली आहे, असे ते म्हणाले. तसेच सर्वांना सुरक्षित, आनंदी आणि हरित होळी साजरी करण्याच्या शुभेच्छा दिल्या.
महत्त्वपूर्ण संदेश
या नैसर्गिक रंगांद्वारे होळी खेळल्यास त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही, डोळ्यांना इजा पोहोचत नाही आणि पाण्याचे प्रदूषणही टाळता येते, असा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांनी समाजापर्यंत पोहोचवला. निसर्गाने दिलेल्या साधनसंपत्तीचा योग्य व जबाबदारीने वापर करणे हीच खरी सण साजरा करण्याची पद्धत आहे, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

