सुरक्षा रक्षकांकडून हप्ता घेणारा पर्यवेक्षक जाळ्यात
नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : सुरक्षा रक्षकाची ड्युटी लावण्यासाठी, तसेच हजेरी नोंदवण्यासाठी दरमहा १०० रुपयांची मागणी करणाऱ्या व सुरक्षा रक्षकाकडून १,९०० रुपयांची लाच घेणाऱ्या सुरक्षा पर्यवेक्षकाला (सुपरवायझर) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनिटने सापळा रचून अटक केली. नीलेश तुकाराम बढे (वय ४६) असे अटक करण्यात आलेल्या पर्यवेक्षकाचे नाव असून, नवी मुंबई एसीबीच्या पथकाने शुक्रवारी (ता. २७) दुपारी वाशी परिसरात ही कारवाई केली.
तक्रारदार हे सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक असून, ते नवी मुंबईत कार्यरत आहेत. नीलेश बढे हे सुरक्षा रक्षक मंडळात सुपरवायझर असून, सध्या ते एमएसइडीसीएल कोपरखैरणे येथे कार्यरत होते. बढे यांच्याकडे सुरक्षा रक्षकांची ड्युटी लावणे, त्यांचे पॉइंट्स चेक करणे आणि हजेरीचा अहवाल पाठवणे ही जबाबदारी होती. बढे यांनी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सुरक्षा रक्षकांचे काम सुरळीत करण्यासाठी तक्रारदार सुरक्षा रक्षकाकडे प्रति महिना १०० रुपये हप्त्याची मागणी केली होती. तक्रारदार आणि त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांची मिळून एकूण १,९०० रुपयांची लाच प्रलंबित होती. ही रक्कम न दिल्यास गैरसोयीच्या ठिकाणी बदली करण्याची किंवा कामावरून काढून प्रतीक्षा यादीत टाकण्याची धमकी बढे यांनी दिली होती. त्यामुळे या सुरक्षा रक्षकाने नवी मुंबई एसीबीकडे धाव घेतली होती. एसीबीने तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शुक्रवारी दुपारी वाशी सेक्टर १५ मधील एमएसईबी कॉलनी येथील सिक्युरीटी चौकीजवळ सापळा लावला होता. या वेळी बढे यांनी तक्रारदार सुरक्षा रक्षकाकडून १,९०० रुपये स्वीकारल्यानंतर एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पथकाने त्यांचा मोबाईल जप्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

