ठाणे जिल्ह्यात दुमदुमला मराठीचा जागर

ठाणे जिल्ह्यात दुमदुमला मराठीचा जागर

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि नव्या पिढीमध्ये भाषेविषयी प्रेम व अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने, मराठी भाषा दिनाचे शासकीय कार्यालयांसह जिल्हा परिषदेच्या शाळा, खासगी शाळा अथवा पालिकांच्या शाळांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी काही ठिकाणी मराठी गीतांची जुगलबंदी पाहायला मिळाली तर, कवी कुसुमाग्रजांच्या कवितांच्या माध्यमातून आठवणींना उजाळा देण्यात आला. विविध कार्यक्रमांनी मराठी दिनाचा जागर जिल्ह्यात झाल्याचे पाहावयास मिळाले.

ज्येष्ठ कवी, साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून टेंभी नाका शाळा क्र. ७, इंग्रजी माध्यम (बालवाडी विभाग) यांच्या वतीने शुक्रवारी (ता. २७) दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संत साहित्याच्या स्मरणाने झाली. पालखीत संत ज्ञानेश्वर यांची आकर्षक व सुशोभित प्रतिमा ठेवली होती. फुलांची सजावट, पारंपरिक रांगोळी आणि ढोल-ताशांच्या गजरात दिंडीला सुरुवात झाली. बालवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मराठी संस्कृतीची झलक सादर केली.
मुलांनी ‘मराठी असे आमची मायबोली’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. काही विद्यार्थ्यांनी मराठी कवितांचे सादरीकरण केले, तर काहींनी मराठी भाषेचे महत्त्व सांगणारी भाषणेही केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास, तिची समृद्ध परंपरा आणि साहित्यिक वारसा याविषयी माहिती दिली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही मातृभाषेबद्दल प्रेम, जिव्हाळा आणि अभिमान निर्माण व्हावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

भाषेच्या जतन, संवर्धनाबाबत मार्गदर्शन
जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्येही मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा बोरिवली येथे विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले. बिजपाडा शाळा, तसेच भिवंडी तालुक्यातील कांदळी येथील जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी शिक्षक अशोक गायकवाड यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना भाषेच्या जतन व संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी समूहगीत गायन करत आणि एकमेकांना शुभेच्छा देत मराठी भाषेप्रती अभिमान व्यक्त केला.


सेंट जॉन दि बाप्टिस्ट शाळेत ग्रंथदिंडी
ठाण्यातील सेंट जॉन दि बाप्टिस्ट हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे ‘मराठी भाषा आमची ओळख, आमचा अभिमान’ या घोषवाक्याखाली सकाळी ७.३० वाजता मराठी दिन साजरा झाला. या वेळी विद्यार्थ्यांकडून मराठी कविता वाचन, भाषणे, नाट्यछटा आणि सांस्कृतिक सादरीकरणे झाली. मराठी भाषेची समृद्ध परंपरा व आधुनिक काळातील उपयुक्तेवरील प्राचार्य रेव्ह. फादर थॉमसन किनी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथ दिंडी काढून लेझीमच्या तालावर ठेका धरला. विद्यार्थी रुद्र याने पोवाडा तर, मराठी भाषेचे महत्त्व विहा परब या विद्यार्थिनीने सांगितले. मराठी विभाग प्रमुख संजीवनी तोंदले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com