‘दबंग’ व्यापाऱ्यांना दणका

‘दबंग’ व्यापाऱ्यांना दणका

Published on

तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारपेठेतील जे व्यापारी गाळ्याच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी शेतमाल विक्री करत आहेत, त्यांची अनुज्ञप्ती रद्द करण्याची प्रक्रिया बाजार समितीने चालू केली आहे. यामुळे ‘दबंग’ व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला बाजारपेठ म्हणजे बेशिस्तपणाचा कळस झाला होता. गेली अनेक वर्षे ही परिस्थिती बाजार आवारामध्ये आहे. बाजार समितीचे सचिव शरद जरे यांना ही बाब निदर्शनास आल्यावर त्यांनी बाजार आवारामध्ये चालणाऱ्या सर्व बेकायदा गोष्टींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात घाऊक भाजीपाला व्यापारी संघानेदेखील प्रशासनाकडे अवैध गोष्टींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार भाजीपाला बाजारपेठेचे उपसचिव दिग्विजय राठोड यांनी धडक मोहीम राबवून बाजारामध्ये शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

गाळ्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी शेतमाल विक्री केल्याने ग्राहक, माथाडी कामगार, तसेच अन्य घटकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत होता. या कारवाईमध्ये प्रथम सर्व व्यापाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये गाळ्यांच्या बाहेर व्यापार करू नये, कॉमन पॅसेजमध्ये शेतमाल विक्री करू नये, तसेच धक्क्यावर ट्रक, टेम्पो यामध्ये शेतमालाची विक्री करू नये, असे बजावण्यात आले होते. काही व्यापाऱ्यांनी याला प्रतिसाद दिला; मात्र काहींनी या सूचनेला केराची टोपली दाखवली. त्यानंतर बोर्डाच्या सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. पूर्वी या घटकांवर थातूरमातूर कारवाई केली जात होती.

दंडवसुलीमध्ये दुप्पट वाढ
जरे यांच्या ही बाब निदर्शनास आल्यावर त्यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे प्रमाण वाढले. पूर्वी दंडात्मक कारवाईची वसुली महिन्याला ३० ते ४० हजार रुपये होत होती, ती आता एक लाखांच्या पुढे गेली आहे. दंड आकारला तरी काही व्यापारी पुन्हा नियमांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले.

पहाटेपासून कारवाई
उपसचिव दिग्विजय राठोड, सहाय्यक सचिव बाळासाहेब टाव्हरे यांनी सुरक्षा पथकासह पहाटे ४ वाजल्यापासून अशा दबंग व्यापाऱ्यांवर स्वतः कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये व्यापाऱ्यांचे जागेवर पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. पुढील टप्प्यात त्यांची अनुज्ञप्ती रद्द करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. या कारवाईमुळे सर्व व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून दोन दिवसांपासून बाजारातील पॅसेज, तसेच धक्क्यावर शेतमाल विक्री केला जात नसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com