घरेलू कामगारांसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतुदीची मागणी
नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : राज्याच्या २०२६-२७ वर्षाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील ३० ते ४० लाख घरेलू कामगारांच्या प्रश्नांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. घरेलू कामगार हा शहरांच्या अर्थचक्राचा कणा आहे; मात्र आजही ९२ टक्के कामगार कोणत्याही सरकारी लाभाविना असुरक्षित जीवन जगत असल्याचे वास्तव महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीने समोर आणली आहे. त्यामुळे समन्वय समितीने घरेलू कामगारांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात स्वतंत्र बजेट हेड आणि ठोस निधीची मागणी केली आहे.
गेल्या १७ वर्षांपासून जनगणना न झाल्यामुळे घरकामगारांची नेमकी संख्या सरकारकडे उपलब्ध नसल्याचे युवा संस्था आणि समन्वय समितीने केलेल्या संयुक्त अभ्यासातून वास्तव समोर आले आहे. त्यातील सुमारे ९९ टक्के महिला असलेल्या या क्षेत्रात ७० टक्के कामगारांची अद्याप नोंदणीच झालेली नाही, तर नोंदणी झालेल्यांपैकी ९२ टक्के महिलांना प्रत्यक्षात कोणताही लाभ मिळालेला नाही. त्यामुळे घरेलू कामगारांसाठी केवळ घोषणा नकोत, तर अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर यंत्रणा उभारावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सरकारकडे मागणी
केवळ निधीची मागणी न करता, समितीने सरकारला उत्पन्नाचे स्रोतही सुचवले आहेत. घरगुती उपकरणे यांच्या विक्रीवर ठरावीक टक्के कल्याणकारी उपकर (सेस) लावणे आणि मालमत्ता करातील काही हिस्सा या निधीकडे वळवणे, यासारखे पर्याय समितीने सुचविले आहेत. तसेच घरेलू कामगार कल्याण मंडळासाठी किमान १०० कोटींची स्वतंत्र तरतूद करावी. घरकामगारांना तासांनुसार किमान वेतन आणि कायदेशीर ओळखपत्र द्यावे. आरोग्य विमा, अपघात विमा, प्रसूती लाभ आणि वृद्धापकाळ पेन्शनची हमी द्यावी. खासगी प्लेसमेंट एजन्सींना कायद्याच्या चौकटीत आणावे. कामगारांच्या मुलांसाठी विशेष शैक्षणिक सहाय्य आणि आर्थिक साक्षरतेसाठी निधी द्यावा, अशी मागणी समन्वय समितीने सरकारकडे केली आहे.
घरेलू कामगार श्रीमंतांची घरे सांभाळतात; पण त्यांचे स्वत:चे भविष्य मात्र अंधारात आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने निर्देश देऊनही सरकार चालढकल करत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात जर घरेलू कामगार कल्याण नावाचे स्वतंत्र बजेट हेड दिसले नाही, तर हा या लाखो कष्टकरी महिलांवर झालेला अन्याय असेल. आता केवळ आश्वासने नकोत, तर अंमलबजावणीसाठी भक्कम आर्थिक तरतूद हवी.
- राजू वंजारे, समन्वयक, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

