कमी दृश्यमानता अन्‌ नेव्हिगेशन साधनांचा अभाव

कमी दृश्यमानता अन्‌ नेव्हिगेशन साधनांचा अभाव

Published on

सुधारित


बारामती विमान अपघात प्रकरण

कमी दृश्यमानता अन्‌ नेव्हिगेशन साधनांचा अभाव

‘एएआयबी’च्या अहवालात ठपका; मानक कार्यपद्धतींचे काटेकाेर पालन आवश्यक


नवी दिल्ली, ता. २८ : बारामती विमान अपघातप्रकरणी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्‍हेस्टिगेशन ब्युराेने (एएआयबी) प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या अहवालात कमी दृश्यमानता आणि धावपट्टीवर आवश्यक नेव्हिगेशन सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आणले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन येणारे व्‍हीटी-एसएसके हे विमान उतरवत असताना आवश्यक किमान पाच किलाेमीटर परिसरातील दृश्यमानतेपेक्षा कमी हाेती, असे अहवालात म्हटले आहे.

मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे व्‍हीएसआर व्‍हेंचर्सचे लीअरजेट ४५ हे खासगी विमान २८ जानेवारीला बारामती विमानतळावर काेसळले हाेते. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह कॅप्टन सुमीत कपूर, सहपायलट कॅप्टन शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माली यांचा मृत्यू झाला हाेता. या अपघाताचा २२ पानी प्राथमिक अहवाल ‘एएआयबी’ने जाहीर केला. विमान धावपट्टीच्या डाव्या बाजूला काेसळण्यापूर्वी ‘ओ शिट... ओ शिट’ हे शब्द रेकाॅर्ड झाल्याचे या अहवालात नमूद केले आहे.

‘एएआयबी’च्या अहवालानुसार, २८ जानेवारीला बारामती विमानतळ येथे हे विमान उतरत असताना दृश्यमानतेची माहिती विचारण्यात आली हाेती. तेव्‍हा नियंत्रण मनोऱ्याकडून ती तीन हजार मीटर (तीन किलाेमीटर) असल्याचे सांगण्यात आले. ही दृश्यमानता आवश्यक किमान मर्यादेपेक्षा कमी होती.

‘एएआयबी’च्या तपासात बारामती विमानतळाबाबत धक्कादायक बाब नमूद करण्यात आली आहे. या विमानतळावर हवामान मापन सुविधाच उपलब्ध नाही. हवामानाची माहिती तात्पुरत्या टॉवरमध्ये बसवलेल्या उपकरणाच्या आधारे विमानांना दिली जाते. तसेच हे विमानतळ अनियंत्रित एअरफिल्ड असून, येथे वाऱ्याची दिशा दर्शविणाऱ्या विंड सॉकव्यतिरिक्त अन्य कोणतीही नेव्हिगेशन सहाय्यक साधने नाहीत. धावपट्टी क्रमांक २९च्या बाजूला दोन विंड सॉक असले तरी धावपट्टी ११च्या बाजूला कोणताही विंड सॉक नव्हता, असे या अहवालात अधाेरेखित केले आहे.

या विमानतळावर केवळ व्हिज्युअल फ्लाइट रूल्स (व्‍हीएफआर)अंतर्गत उड्डाणांना परवानगी आहे; तरीही येथून नियमित प्रशिक्षण उड्डाणे आणि नॉन-शेड्युल ऑपरेशन्स होत आहेत. धावपट्टीचे शेवटचे पुनर्पृष्ठीकरण मार्च २०१६मध्ये झाले होते. त्यानंतर ते न झाल्यामुळे धावपट्टीवरील मार्किंग धूसर झाली असून खडीही निघालेली आढळली आहे, असे अहवालात नमूद केले आहे.

तपासादरम्यान विमानातील साॅलिड-स्टेट फ्लाइट डेटा रेकाॅर्डर आणि काॅकपिट व्‍हाॅइस रेकाॅर्डर (सीव्‍हीआर) शेपटीच्या भागात सापडले असून ते विश्लेषणासाठी घेण्यात आली असल्याचे अहवालात म्हटले आहे. अपघातात सीव्‍हीआर खराब झाले आहे. यूएस नॅशनल ट्रान्स्पाेर्ट सेफ्टी बाेर्डच्या मदतीने सीव्‍हीआरमधील डेटा डाउनलाेड करण्यात येणार आहे.

तपासात दोन्ही वैमानिकांनी यापूर्वीही बारामती येथे उड्डाण केले होते आणि त्यांना विमानतळाची भौगोलिक स्थिती माहिती होती. दोन्ही वैमानिकांनी उड्डाणापूर्वीचा ब्रिथ अ‍ॅनालायझर चाचणीही झाली हाेती. तसेच या विमानाने २६ जानेवारीला मुंबई- सुरत- मुंबई असा शेवटचा प्रवास केला होता. तेव्‍हा विमानात कोणतीही बिघाडाची नोंद नव्हती, असे स्पष्‍ट झाले आहे.
दरम्यान, या अपघाताची नेमकी आणि मूळ कारणे तसेच अन्य संबंधित घटक शोधण्यासाठी सविस्तर तपास सुरू असून, अंतिम अहवाल पुढील तपासानंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे एएआयबीने म्हटले आहे.
----
मानक कार्यपद्धतीचे पालन आवश्यक
‘एएआयबी’ने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला महत्त्वाची शिफारस केली आहे. अनियंत्रित विमानतळांवर ‘व्‍हीएफआर’ उड्डाण करणाऱ्या सर्व ऑपरेटरनी निश्चित केलेल्या मानक कार्यपद्धतींचे काटेकोर पालन करावे. तसेच अशा विमानतळांवर लँडिंग सहाय्यक साधने व मूलभूत हवामान सुविधा वाढविण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com