केळवेतील पर्यटनाला बळ
केळवेतील पर्यटनाला बळ
सुशोभीकरणासाठी दोन कोटींचा निधी
पालघर, ता. १ ः केळवे समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच राबवणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेत पहिल्या टप्प्यात दोन कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.
केळवे समुद्रकिनाऱ्यावर वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, मूलभूत सुविधांचा अभाव, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतागृहांची असुविधांमुळे पर्यटकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. याच अनुषंगाने सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र खुल्या शेडची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्टॉल्सना पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच किनाऱ्याचे सौंदर्य अबाधित राहील. याशिवाय समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गाचे सुस्थितीकरण करण्यात येणार आहे.
---------------------------------
रोजगाराच्या नव्या संधी
- केळवे समुद्रकिनाऱ्याचा चेहरामोहरा बदलणार असून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. पर्यटनवाढीने परिसरातील लघुउद्योग, खाद्यव्यवसाय आणि वाहतूक व्यवसायालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपक्रमामुळे केळवे समुद्रकिनारा पर्यटन विकासाला नवे बळ मिळणार आहे. तसेच टप्प्याटप्प्याने सुशोभीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
-----------------------------
प्रस्तावित कामे
- फेरीवाल्यांसाठी खुल्या शेडची उभारणी
- पर्यटकांसाठी अंतर्गत रस्त्यांचे विकासकाम
- केळवे किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गाचे सुस्थितीकरण
- स्वच्छ, सुसज्ज प्रसाधनगृह उभारणी

