अनधिकृत हातगाड्या-फेरीवाल्यांचा विळखा
टिटवाळा स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा विळखा
पदचाऱ्यांचा जीव मुठीत, मंडईची मागणी जोरात
टिटवाळा, ता. १ (वार्ताहर) : टिटवाळा रेल्वे स्थानक परिसर सध्या अनधिकृत हातगाड्या, फेरीवाले आणि वाढत्या अतिक्रमणांमुळे कोंडीच्या विळख्यात सापडला आहे. पदपथांवर (फुटपाथ) फेरीवाल्यांचे राज्य असल्याने प्रवाशांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागत असून, यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांकडे धाव घेऊन कायमस्वरूपी मंडई उभारण्याची मागणी केली आहे.
टिटवाळा स्थानकाच्या बाहेरील मुख्य रस्ते फेरीवाल्यांनी व्यापल्यामुळे सकाळ-संध्याकाळ प्रवाशांना चालणेही कठीण झाले आहे. महासंघाचे ॲड. जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या निवेदनात प्रशासनाच्या भूमिकेवर कडक ताशेरे ओढले आहेत.
महापालिकेकडून होणारी कारवाई केवळ दिखाऊ स्वरूपाची असून, पथक निघून गेल्यावर अवघ्या काही तासांत परिस्थिती ‘जैसे थे’ होते. फेरीवाल्यांसोबतच नो-पार्किंगमधील वाहने आणि रिक्षांच्या बेशिस्त रांगांमुळे वाहतुकीचा वेग मंदावतो.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना या गर्दीतून वाट काढताना मोठी कसरत करावी लागते.
‘मंडई’ हाच एकमेव पर्याय
अतिक्रमणाची ही समस्या तात्पुरती सोडवण्याऐवजी ती मुळापासून उपटण्यासाठी नियोजित जागेवर सुसज्ज मंडई उभारणे आवश्यक असल्याचे महासंघाने अधोरेखित केले आहे. अधिकृत मंडई उभारल्यास फेरीवाल्यांचे पुनर्वसन होईल आणि पदपथ नागरिकांसाठी मोकळे होतील. ही केवळ अतिक्रमणाविरोधी मोहीम नसून शहराच्या शिस्तबद्ध विकासासाठी घेतलेले महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
फुटपाथ नेमका कोणासाठी?
शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना पायाभूत सुविधांचे नियोजन मागे पडत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. केवळ तात्पुरत्या नोटिसा न काढता प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. आता पालिका प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन ठोस कृती करणार का, याकडे टिटवाळावासीयांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

