गहाण ठेवलेले साडेचार लाखांचे सोने घेऊन ज्वेलर्स दुकानदार फरार
गहाण ठेवलेले सोने घेऊन ज्वेलर्समालक पसार
अंगणवाडी शिक्षिकेची साडेचार लाखांची फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : मुलीच्या शिक्षणासाठी गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने एका ज्वेलर्सवाल्याने पळवल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्तकनगर परिसरातील वारीमाता गोल्ड दुकान बंद करून मालक पसार झाल्याने एका अंगणवाडी शिक्षिकेला मोठा फटका बसला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबई, रबाळे येथील मनीषा जठाडे (वय ४५) या पवई आयआयटी मार्केट परिसरातील अंगणवाडीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या लहान मुलीच्या शिक्षणासाठी पैशांची गरज भासल्याने जठाडे यांनी सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नातेवाइकांच्या ओळखीने वर्तकनगर परिसरातील वारीमाता गोल्ड या दुकानाचे मालक मुकेश याच्याशी त्यांची ओळख झाली. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांनी दागिने गहाण ठेवून महिना दोन टक्के व्याजदराने दोन लाख २० हजार रुपये घेतले. मुकेशने दागिने गहाण ठेवल्याची पावती देत मुद्दल व व्याज परत केल्यानंतर सोने परत देण्याची हमी दिली होती. त्यामध्ये एक लाख ८० हजारांचा २८.९२० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, एक लाख १० हजारांचा १६.३४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, एक लाख २० हजारांचा १८.७६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट आणि ८० हजारांच्या १०.२१० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या असा चार लाख ९० हजारांचे एकूण सुमारे ७४.२३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असल्याचे नमूद केले आहे.
ज्वेलर्समालक फरार
जानेवारी २०२३ मध्ये व्याज भरण्यासाठी मनीषा जठाडे दुकानात गेल्या असता ते बंद असल्याचे आढळले. चौकशी केली असता मालक ज्वेलर्सचे दुकान बंद करून निघून गेल्याचे समजले. त्याच्या राहत्या घरी शोध घेतल्यानंतरही तो तेथूनही गायब असल्याचे समोर आले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मनिषा जठाडे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पुढील तपास वर्तकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रविण माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

