‘शहिदी समागम’साठी भाविकांचा जत्था

‘शहिदी समागम’साठी भाविकांचा जत्था

Published on

खारघर, ता. १ (बातमीदार) : शीख धर्मातील महान संत श्री गुरू तेग बहादूर जी यांच्या ३५०व्या शहिदी समागमाच्या निमित्ताने खारघर परिसरात ऐतिहासिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या विशेष कार्यक्रमाचा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभव घेण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक खारघरमध्ये दाखल होत आहेत. यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला आहे.

अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समितीच्या वतीने खारघर येथे आयोजित या सोहळ्यात शीख समाजासह बंजारा, लबाना, वारकरी, सिंधी, वाल्मिकी आदिवासी आदी सर्वधर्मीय भाविक राज्याच्या विविध भागातून सहभागी झाले आहेत. बहुतांश भाविक शनिवार (ता. २८) दुपारी, तर काही रविवारी (ता. १) सकाळी दाखल झाले. शनिवारी आलेल्या भाविकांसाठी पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील हॉटेल्स, समाजमंदिर आदी ठिकाणी सोय करण्यात आली होती. काही शीख व्यक्तींनी कार्यक्रमस्थळी स्टॉलवर रुमाल, खंजीर, हातातले कडे विक्रीसाठी ठेवले होते. या स्टॉलवर भाविकांनी गर्दी केली होती.

देवीच्या दर्शनासाठी महिलांची पसंती
हिंद-दी-चादर कार्यक्रमात कीर्तन, गुरबाणी पठण, लंगर, तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक आणि अहिल्यानगर भागातून आलेल्या महिलांनी देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, कार्यक्रमस्थळी लंगरची सेवा पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केले.

भाविकांच्या आरोग्याची काळजी
वाढत्या उन्हाची झळ पोहोचू नये, म्हणून टँकरसह पाणी बॉटल सर्व रस्ते आणि चौकात सोय करण्यात आली होती. नवी मुंबई, पनवेल महापालिका, तसेच एम.जी.एम. वाशी आणि घणसोली येथील डिव्हाइन हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचारासाठी स्टॉल उभारण्यात आले होते.

सामाजिक संस्थांकडून मोफत सेवा
शिल्प चौककडून सेंट्रल पार्कमार्गे कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या मोफत डोसा आणि पाणी बॉटल स्टॉलवर भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांसाठी राज्य सरकार, तसेच काही सामाजिक संस्थांकडून मोफत बससेवा आणि ट्रॅव्हल्स उपलब्ध करून देण्यात आले होते.

चित्रफीतच्या माध्यमातून माहिती
बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखला जाणाऱ्या पोहरागड येथे उभारण्यात आलेल्या नंगारा भवनमध्ये बंजारा विरासत संग्रहालयात चित्रफीतच्या माध्यमातून बंजारा संस्कृतीच्या इतिहासात संत सेवालाल महाराज, तसेच गुरू नानक यांच्या जीवनाची माहिती दिली आहे. त्यामुळे यवतमाळ, जळगाव आणि नंदुरबार आदी भागातून बंजारा समाजाचे भाविक मोठ्या प्रमाणात दिसून आले.

हिंद-दी-चादर या सोहळ्यासाठी परिसरात स्वच्छता, प्रकाशयोजना, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, तसेच निवास आणि भोजनाची उत्तम व्यवस्था उत्तम करण्यात आली होती. या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्याचा अनोखा अनुभव मिळत आहे.
- शोभा काटे, चिपरी, कोल्हापूर

श्री गुरू तेग बहादूर जी यांच्या बलिदानाचा संदेश, धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता आणि मानवतेचे रक्षण आजही समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळे या शहिदी समागमाला विशेष ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
- हरविंदर सिंग, गणेश पेठ, पुणे

Marathi News Esakal
www.esakal.com