मुंबई
उन्हात बहरल्या बोगनवेल
उन्हात बहरल्या बोगनवेल
बेलापूर, ता. १ (बातमीदार) : रखरखत्या उन्हामुळे तापमान २९ अंश सेल्सिअसवर पोहोचून नागरिकांची लाहीलाही होत असताना शहरातील पाम बीच मार्ग तसेच विविध रस्ते, चौक आणि उड्डाणपुलांवरील रंगीबेरंगी बोगनवेलींनी वातावरणात आल्हाददायक बदल घडवला आहे. सफेद, भगवे, गुलाबी व पिवळ्या छटांमध्ये बहरलेल्या या वेलींमुळे रस्त्यांच्या दुभाजकांपासून उद्यानांपर्यंत शहराचे रूप खुलले असून नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. फेब्रुवारी ते मे हा बोगनवेलीच्या बहराचा काळ मानला जातो. उष्णकटिबंधीय हवामानात चांगली वाढ होणाऱ्या या वनस्पतींसोबत घाणेरी (लॅनटाना)ची फुलेही खुलली आहेत. प्रखर उन्हातही निसर्गाने फुलवलेल्या या रंगोत्सवामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे.

