मराठी शाळा बंद करून भाषेचे संवर्धन कसे होणार? मराठी भाषा गौरवदिनानिमित्त सवाल

मराठी शाळा बंद करून भाषेचे संवर्धन कसे होणार? मराठी भाषा गौरवदिनानिमित्त सवाल

Published on

मराठी शाळा बंद करून भाषेचे संवर्धन कसे होणार? मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सवाल
शिवडी, ता. १ (बातमीदार) : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला, तरी राज्यात मराठी शाळाच कमी होत असतील, तर भाषेचे संवर्धन कसे होणार, असा सवाल राष्ट्रीय मिल मजूर संघाचे सरचिटणीस तथा वाचनालयाचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी उपस्थित केला.
परळ पूर्व येथील राष्ट्रीय मिल मजूर संघाच्या सभागृहात आमदार सचिन अहिर यांच्या पुढाकाराने शुक्रवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त हा दिन दरवर्षी साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला गोविंदराव मोहिते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी उपस्थित वाचक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोहिते म्हणाले, “श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या ओजस्वी लेखणीतून मराठी भाषेला नवा आयाम दिला. त्यानंतरच्या पिढ्यांनीही मराठी साहित्य समृद्ध केले. मात्र, आज शिक्षकांचे वेतन आणि घटती पटसंख्या या कारणांमुळे मराठी शाळा बंद होत असतील, तर भाषेचे जतन कसे होणार? मराठी भाषा अनिवार्यच नव्हे, तर सक्तीची झाली पाहिजे. तरच शाळांतील गळती थांबेल.”
स्वातंत्र्याच्या इतिहासाबाबत मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, भारताच्या स्वातंत्र्याचा प्रगल्भ इतिहास ज्येष्ठ इतिहासकारांनी लिहिला आहे; तो विसरून चालणार नाही. या कार्यक्रमास उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, संचालक मारुती शिंत्रे, सचिव शिवाजी काळे, विलास डांगे, नाट्यकर्मी राघवकुमार, सहायक सचिव मोहन पोळ, शाखाप्रमुख दिक्षा गुंजाळ आदी उपस्थित होते. प्रारंभी ग्रंथपाल ममता घाडी यांनी प्रास्ताविक केले. भाषा दिनाचे औचित्य साधून अनेक वाचकांना ग्रंथ भेट देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com