मुरबाडमध्ये पारंपारिक शिमग्याचा जल्लोष
मुरबाडच्या ग्रामीण भागात पारंपरिक शिमगोत्सव
पुरणपोळीच्या नैवेद्याने होळी प्रज्वलित; झिम्मा-फुगडी, डफड्यांचा नाद
टोकावडे, ता. ३ (बातमीदार) : वसंत ऋतूच्या आगमनासोबतच मुरबाड तालुक्यात पारंपरिक शिमगोत्सवाचा जल्लोष सुरू झाला आहे. केवळ रंगांचा सण न राहता परंपरा, सामाजिक ऐक्य आणि आनंदाचे प्रतीक असलेला हा उत्सव मुरबाडच्या ग्रामीण भागात सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तालुक्यातील अनेक गावांत आजही पाच दिवसांचा शिमगा साजरा करण्याची जुनी परंपरा जपली जाते. पाच दिवस लहान होळ्या पेटवून, पाचव्या दिवशी संपूर्ण गावकरी एकत्र येत मुख्य होळी प्रज्वलित करतात. प्रत्येक घरातून वाळलेली लाकडे आणि गवत एकत्र करून होळीच्या मैदानात मोठा ढीग रचला जातो. होळीसाठी खड्डा खोदून त्यात उंच बांबू रोवला जातो. या बांबूला भाजलेल्या पापड्या आणि खोबऱ्याच्या वाट्यांच्या माळा बांधून कुलदेवतेचे पूजन केले जाते.
पारंपरिक विधी आणि नैवेद्य
लहान मुलांनी गळ्यात साखरगाठी घालून आणि हातात डफडे घेऊन केलेल्या गोंगाटाने गावकूस दुमदुमून गेला होता. घरोघरी तयार केलेली पुरणपोळी आणि पंचपक्वानांचा नैवेद्य होळीला अर्पण करून ग्रामस्थांनी सुख-समृद्धीचे साकडे घातले. नवविवाहित जोडप्यांनीही नारळ अर्पण करून सुखी संसारासाठी नवस बोलले.
रात्रीचा जागर आणि खेळांचा थरार
होळी पेटल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गावात भजने, झिम्मा-फुगडी आणि लोकगीतांचे कार्यक्रम रंगले होते. तरुणाईसाठी अनेक गावांत होळी प्रीमियर लीग (क्रिकेट) आणि कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे उत्सवात अधिकच चुरस निर्माण झाली आहे. शहरी भागात हा केवळ रंगांचा सण मानला जात असला, तरी मुरबाडच्या ग्रामीण भागात मात्र ही परंपरा जपणारा आणि आपापसातील प्रेम दृढ करणारा सामाजिक सोहळा आहे, अशी भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

