टिटवाळा स्थानकात अस्वच्छता व जीवघेणी गर्दी

टिटवाळा स्थानकात अस्वच्छता व जीवघेणी गर्दी

Published on

टिटवाळा रेल्वे स्थानकात नरकयातना
स्वच्छतागृहांची दुरवस्था, अरुंद पुलामुळे अपघाताची भीती

टिटवाळा, ता. ३ (वार्ताहर) : उपनगरी रेल्वेचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या टिटवाळा स्थानकात प्रवाशांच्या मूलभूत सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे आणि जीवघेणी गर्दी यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी आज आक्रमक पवित्रा घेत रेल्वे प्रशासनाला दोन स्वतंत्र निवेदने सादर केली. प्रशासनाने तातडीने सुधारणा न केल्यास आंदोलनाचा इशाराही या वेळी देण्यात आला.

पहिल्या निवेदनात प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील स्वच्छतागृहांच्या भीषण स्थितीकडे लक्ष वेधण्यात आले आहे. प्रचंड दुर्गंधी, पाण्याचा अभाव आणि देखभालीत कमालीचा निष्काळजी याबद्दल तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच असुविधेमुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने कंत्राटदारावर कारवाई करून नियमित साफसफाई आणि पाण्याची सोय सुनिश्चित करावी.

दुसऱ्या निवेदनात स्थानकावरील मध्यवर्ती पुलाच्या समस्येवर बोट ठेवण्यात आले आहे. सध्या कर्जत आणि कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या प्रवाशांची सकाळ-संध्याकाळ प्रचंड झुंबड उडते. अरुंद पुलामुळे चेंगराचेंगरीचा धोका वाढला असून, घाईत असलेले अनेक प्रवासी चक्क रुळ ओलांडण्याचा जीवघेणा मार्ग अवलंबत आहेत. त्यामुळे एस्केलेटर आणि नवीन पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, तसेच गर्दीच्या वेळी आरपीएफ जवानांची तैनात करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

प्रवासी संघटनांचा एल्गार
निवेदनावेळी प्रवाशांचा मोठा समूह उपस्थित होता. ॲड. अविनाश शिळकंदे, विशेष कार्यकारी अधिकारी दिलीप राठोड, भाऊसाहेब घोडके काका, समाजसेवक अनिल दुबे, निवृत्ती दराडे, संतोष जाधव व ऋषी कवटकर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून ‘आश्वासने नको, कृती हवी’ अशी ठाम भूमिका मांडली. टिटवाळ्याचा विस्तार झपाट्याने होत असताना रेल्वे सुविधा मात्र १८ व्या शतकातील वाटत आहेत. जर प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न सुटला नाही, तर येणाऱ्या काळात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, अशी भूमिका प्रवासी संघटनांनी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com