नाल्याची दुर्गंधी, साचलेला कचरा

नाल्याची दुर्गंधी, साचलेला कचरा

Published on

उल्हासनगर कॅम्प पाचमध्ये स्वच्छतेचा बोजवारा

उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : शहरातील कॅम्प नंबर पाच, धर्माजी पाटील कॉलनी परिसरात स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. स्वामी शांतीप्रकाश शाळेच्या मागील बाजूने वाहणाऱ्या नाल्यात साचलेला कचरा आणि सडलेल्या प्लॅस्टिकमुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाच्या या कमालीच्या उदासीनतेमुळे हजारो विद्यार्थ्यांसह स्थानिकांचे आरोग्य आता धोक्यात आले आहे.

धर्माजी पाटील कॉलनीतील या नाल्याची गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छता झालेली नाही. नाल्यात मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक पिशव्या, घरातील टाकाऊ वस्तू आणि सांडपाणी साचून राहिल्याने पाण्याचा निचरा थांबला आहे. यामुळे तयार झालेल्या काळपट पाण्यामुळे संपूर्ण परिसरात श्वास घेणेही कठीण झाले आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी या दुर्गंधीची तीव्रता इतकी वाढते, की नागरिकांना रस्त्यावरून चालणेही असह्य होते. या नाल्यालगतच मोठी शाळा असल्याने दररोज हजारो विद्यार्थी याच मार्गावरून ये-जा करतात. साचलेल्या घाणेरड्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, परिसरात डेंगी आणि मलेरियासारख्या जीवघेण्या आजारांची भीती व्यक्त केली जात आहे. ‘आमच्या मुलांच्या आरोग्याशी खेळू नका,’ अशी संतप्त भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

समाजसेवक संदीप सिंग यांनी यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत; मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. कचरा उचलणे तर दूरच, साध्या कीटकनाशक फवारणीसाठीही पालिकेला वेळ नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या
नाल्याची तातडीने यंत्राद्वारे पूर्ण साफसफाई करणे.
परिसरात नियमित कीटकनाशक फवारणी सुरू करणे.
कामात कुचराई करणाऱ्या संबंधित आरोग्य निरीक्षकांवर कारवाई करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com