धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळात रंगपंचमीचा उत्साह

धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळात रंगपंचमीचा उत्साह
Published on

धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेत रंगपंचमीचा उत्साह
विठाई प्रतिष्ठानचा पुढाकार; विशेष विद्यार्थ्यांचा जल्लोष
ठाणे, ता. ३ (बातमीदार) : रंगांचा उत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत असताना ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेत विशेष मुलांची रंगपंचमी मोठ्या उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, मराठी-हिंदी गाण्यांच्या तालावर आणि नैसर्गिक रंगांच्या उधळणीत आनंद लुटला.
विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित कमलाकर चव्हाण यांच्या पुढाकाराने विशेष मुलांसाठी होळीचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (ता. २) शाळेच्या पटांगणात विधीपूर्वक होळी दहन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करीत नृत्य-संगीताचा मनमुराद आनंद घेतला असून, पालकदेखील उत्सवात सहभागी झाले होते. या वेळी उपस्थितांनी शाळेच्या प्राचार्या अर्चना शेट्ये यांचे आणि ठाणे पालिकेचे विशेष आभार मानले. या होळी उत्सवात कलाकार सचिन भांगरे, सायली सावंत, लता चोपा, सिद्धार्थ भोसले आदी प्रतिनिधी उपस्थित होते. गेल्या चार-पाच वर्षांत एवढे आजारपण सगळ्यांनी अनुभवले आहे, तर होळीची मजा सगळ्यांनी घ्यायचीच आहे. ती टाळायचीच नाही. पण होळी किंवा कुठलेही सण सुरक्षितपणे साजरे करणे हे खूप गरजेचे आहे. हे सगळं सांभाळून आपल्याला पुढे जायचे आहे. आपले सण आपण विसरायचे नाहीत, पण आपण सुरक्षित सण साजरे करायचे आहेत, असे शाळेच्या प्राचार्या अर्चना शेट्ये म्हणाल्या.


हास्यमय ऊर्जा मिळते
गेली अनेक वर्षे सातत्याने आम्ही या मुलांबरोबर होळी खेळत आहोत. आम्हाला आमच्या जीवनामध्ये या मुलांची आजच्या दिवसाची हास्यमय ऊर्जा आहे ती घेऊनच पुढे काम करायची प्रेरणा मिळते, म्हणून आम्ही या शाळेमध्ये गेली १९ वर्षे सातत्याने येतो आहोत. विशेष मुलांसाठी होळी हा केवळ सण नसून, एक प्रकारची थेरपी असल्याचे अभिजित चव्हाण यांनी सांगितले.
दोन दरवर्षी हा एक खूप गोड अनुभव असतो. आम्ही न चुकता दरवर्षी या दिवशी येऊन या छोट्या मुलांची सेवा करीत असतो. आजचा आनंद पराकोटीचा असतो आणि हा आनंद सर्वांनी घ्यावा, अशी सर्वांना इच्छा असल्याचे कलाकार सचिन भांगरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com