सावरकरांना गांधी हत्येत गोवण्याचा प्रयत्न
तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना महात्मा गांधी यांच्या हत्येत विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला होता, असे प्रतिपादन लेखक प्रखर श्रीवास्तव यांनी वाशी येथे केले.
मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ आणि सावरकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त ‘हे राम - गांधी हत्याकांड की प्रामाणिक पडताल’ पुस्तकाचे लेखक प्रखर श्रीवास्तव यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी यांनी केले. या वेळी व्यासपीठावर साहित्य मंडळाचे पदाधिकारी रवींद्र नेने, कच्छ युवा मंडळाचे अध्यक्ष राहुल देडिया, हिमाचल मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज अवस्थी, जम्मू-कश्मीर डोगरा समाजाचे अध्यक्ष कृष्णा पंडित उपस्थित होते.
प्रखर श्रीवास्तव म्हणाले, की २० जानेवारीला गांधींच्या हत्येचा प्रयत्न होतो, त्यात मदनलाल पाहवा पकडला जातो. कटाचा मुख्य सूत्रधार हा महाराष्ट्रातल्या अग्रणी वृत्तपत्राचा संपादक असल्याची माहिती मदनलाल पोलिसांना देतो, तरीही ३० जानेवारीला नथुराम हे बिर्ला भवनमध्ये गांधींची हत्या करतात. यात दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद पोलिसांची निष्काळजी ही अक्षम्य चूक होती. लहान-सहान गोष्टींवर उपोषण करणाऱ्या गांधींनी फाळणीसारख्या गंभीर विषयावर उपोषण का केले नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण, १९४२चे चले जाव आंदोलन, इच्छाशक्तीचा अभाव ही देशाच्या फाळणीची कारणे आहेत. पाकिस्तानला दिलेले ५५ कोटी रुपये, विस्थापितांबाबत गांधींचा भेदभाव यातून नथुरामची गांधीहत्येची स्पष्ट भूमिका तयार झाली. बडगेच्या खोट्या साक्षीच्या आधारावर सावरकरांचे चारित्र्य कलंकित करण्याचा प्रयत्न केला गेला. संघाचा काडीमात्र संबंध नसताना द्वेषभावनेतून संघटनेवर बंदी घालण्यात आली. गांधीहत्येमुळे देशातील हिंदुत्व विचारधारेला बदनाम करण्याची आयती संधी काँग्रेसला मिळाली, असे विचार श्रीवास्तव यांनी मांडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

