श्री मलंगगडावर हुताशनी पौर्णिमा उत्साहात साजरी
श्री मलंगगडावर हुताशनी पौर्णिमेचा उत्साह
कडेकोट बंदोबस्तात महाआरती; पुरणपोळी-पापडीचा पारंपरिक नैवेद्य
डोंबिवली, ता. ३ : कल्याणनजीकच्या ऐतिहासिक श्री मलंगगड येथे हुताशनी पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. हिंदू मंचाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील शेकडो भाविकांनी उपस्थित राहून श्री मलंग मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेतले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मलंगनाथांना पुरणपोळी आणि तांदळाच्या पिठाच्या पापड्यांचा पारंपरिक नैवेद्य अर्पण करण्यात आला. टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘अलख निरंजन’च्या जयघोषात गडावर महाआरती करण्यात आली. हरिनामाच्या गजराने संपूर्ण गड परिसर भक्तिमय झाला होता. गतवर्षीच्या काही घटनांचा अनुभव लक्षात घेता, यंदा हुताशनी पौर्णिमेनिमित्त हिललाइन पोलिस ठाण्यामार्फत गडावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस अधिकारी आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात होत्या. पोलिसांनी चोख नियोजन केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता सोहळा शांततेत पार पडला.
हिंदुत्ववादी संघटनांची उपस्थिती
धार्मिक सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने पराग तेली, राजेश गायकर, विकास महाराज बोराडे, ओंकार पावशे, किरण भाग्यवंत, संदीप जगताप आदी मान्यवरांचा समावेश होता. गडावरील धार्मिक परंपरा आणि श्रद्धा जपण्यासाठी सर्व भाविकांनी शिस्त पाळून सहकार्य केले, त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

