संविधान पोवाड्याची दणदणीत सादरीकरणे
अंबरनाथ, ता. ४ (वार्ताहर) : पी. डी. कारखानीस कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स येथे वाणिज्य विभाग व आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक पारितोषिक वितरण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ आयोजित ‘उडान’ महोत्सवात तृतीय पारितोषिक पटकावलेला संविधान पोवाडा सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. वीज खंडित होऊनही विद्यार्थ्यांचा उत्साह दुणावलेला दिसून आला. सुमारे १५०हून अधिक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. संदीपान नवगिरे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून अंबरनाथच्या नव-निर्वाचित नगराध्यक्ष सीए तेजश्री करंजुले पाटील उपस्थित होत्या. द एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाह दिलीप साठे, कार्यकारिणी सदस्य दिलीप कणसे, संचालक दामले व दीपक चव्हाण यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे नियोजन वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. शुभांगी केदारे यांनी केले. प्रथम वर्ष वाणिज्यचे विद्यार्थी अजय केंगार यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे ‘माझी मैना गावाकडे राहिली’ हे गीत सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी महामानव व छत्रपती शिवाजी महाराज यांना गीतातून अभिवादन केले. तृतीय वर्षातील विद्यार्थी हर्ष जाधव यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून दाद मिळवली.
उडान महोत्सवातील पोवाडा गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक तसेच पथनाट्यात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये पथनाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. त्यानंतर वाणिज्य विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व रोख पारितोषिके देण्यात आली. धनश्री नलावडे, आकाश मोंडल, रसिका पवार, दर्शन कोठावदे, धनंजय साबळे, आकाश यादव व करीना धोबी यांचा सन्मान करण्यात आला.
सीएमए एंटर परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या पवन नेमाने, दर्शन कोठावदे, श्रुती मस्किन व श्वेता आंब्रे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सीए, सीएमए व सीएस परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. शारीरिक अडचणींवर मात करून शिक्षणात प्रगती करणाऱ्या समीक्षा मोरे, शरण पुजारी व ब्रिस्टिंग मलिक यांचे कौतुक करण्यात आले. तसेच विवाहित विद्यार्थिनींनीही शिक्षण सुरू ठेवत प्रगती साधल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
परिश्रमानेच मोठी स्वप्ने
नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत शिस्त, संयम व कठोर परिश्रम यांच्या बळावर मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात, असे मार्गदर्शन केले. दिलीप साठे यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सीए होण्याचे आवाहन केले, तर डॉ. नवगिरे यांनी शिक्षणामुळे समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होतो, असे प्रतिपादन केले.
अंबरनाथ : पी. डी. कारखानीस कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात ‘उडान’ विजेत्यांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

