मुंब्र्यात अल्पवयीन बेपत्ता प्रकरणांची मालिका
मुंब्र्यात एका रात्रीत तीन अल्पवयीन मुले गायब
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : मुंब्रा परिसरात एका रात्रीत तीन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या घटनांनी एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित मुलांना कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, मुंब्रा पोलिस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रविवारी (ता. १) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास १४ वर्षीय मुलगी बाथरूमला जाते, असे सांगून घराबाहेर पडली. ती परतली नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. शोध घेऊनही ती न मिळाल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. याच रात्री मुंब्र्यातील १६ वर्षीय मुलगाही बाथरूमला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला आणि तोही घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतल्यानंतर त्यालाही अनोळखी व्यक्तीने फूस लावून नेल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांत धाव घेतली.
तिसऱ्या घटनेत, १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी त्याच सुमारास घरातून बाथरूमला जाते सांगून बाहेर गेल्यानंतर ती बेपत्ता झाली. तीही परत न आल्याने कुटुंबीयांनी अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे. या तिन्ही घटनांमध्ये साम्य आढळून येत असल्याने पोलिसांनी या प्रकरणांकडे गंभीरतेने पाहण्यास सुरुवात केली आहे. एकाच दिवशी एकाच वेळी सलग तीन घडलेल्या या घटनांमुळे मुंब्रा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

