वृद्ध नागरिकांच्या सहकार्याने ट्रॅफिक कोंडीवर उपाय
वृद्ध नागरिकांच्या सहकार्याने कोंडीवर उपाय
कर्जतमध्ये ‘वाहतूक पोलिस मित्र मंडळ’चा पुढाकार
कर्जत, ता. ३ (बातमीदार) ः पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कर्जत शहरात पर्यटकांची मोठी वर्दळ असते. मात्र, याच पर्यटनामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन याचा फटका स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांना मोठ्या प्रमाणावर बसत होता. कर्जत शहरालगतचे चारफाटा आणि श्रीराम पूल या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पोलिस प्रशासनासमोरही मोठे आव्हान निर्माण झाले होते. या समस्येवर मात करण्यासाठी आता कर्जतच्या जागरूक नागरिकांनी पुढाकार घेतला असून, वाहतूक पोलिस मित्र मंडळ स्थापन करून त्यांनी वाहतूक सुव्यवस्थित ठेवण्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.
कर्जत शहरालगत चारफाटा आणि श्रीराम पूल या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनाही कमी मनुष्यबळामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर काही जागरूक नागरिकांनी पुढाकार घेत वाहतूक पोलिस मित्र मंडळ स्थापन केले असून, २४ जानेवारीपासून हा उपक्रम सुरू केला आहे. सकाळ व संध्याकाळ आळीपाळीने मंडळाचे सदस्य वाहतूक पोलिसांना मदत करत आहेत. विशेषतः रोज संध्याकाळी सुमारे ५ ते ८ वाजेपर्यंत सदस्य चारफाटा आणि श्रीराम पूल परिसरात उपस्थित राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतात. शनिवार-रविवारी मोठी गर्दी असल्यास अधिक सदस्य मदतीसाठी हजर असतात. नागरिकांच्या या स्वयंप्रेरित उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, प्रशासनालाही या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळत आहे.
६० ते ७४ वयोगटातील ज्येष्ठांचा समावेश
सुरुवातीला केवळ पाच ते सात सदस्यांनी सुरू केलेल्या या मोहिमेत आता तब्बल १९ जणांचा सहभाग झाला आहे. विशेष बाब म्हणजे या गटात ६० ते ७४ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचाही मोठा सहभाग आहे. कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून या शिलेदारांना समाजकार्याची प्रेरणा मिळाली असून, त्यांनी स्वयंप्रेरणेने हे काम हाती घेतले आहे. कर्जत पोलिस ठाण्याच्या वतीने या स्वयंसेवकांना हिरवे जॅकेट, शिट्टी व टोपी देऊन अधिकृत ओळखही देण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी झाल्यास पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडते, अशा वेळी आम्ही त्यांना मदत करतो. प्रत्येक सदस्याला ठराविक वार देण्यात आला असून, त्या-त्या दिवशी ते कर्तव्य बजावतात. वेळेचे कठोर बंधन नसून परिस्थितीनुसार सदस्य जास्त वेळही थांबतात. वाहनचालकांनी शिस्त पाळावी, ओव्हरटेक करू नये आणि वाढीव लेन तयार करू नये. पोलिसांना व स्वयंसेवकांना सहकार्य करावे.
- सतीश मुसळे, स्थानिक ज्येष्ठ सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

