महापालिकेच्या रुग्णालयांत रिकाम्या खाटांचा ‘डॅशबोर्ड’
महापालिकेच्या रुग्णालयांत रिकाम्या खाटांचा ‘डॅशबोर्ड’
रुग्णांना तत्काळ माहिती; एचएमआयएस प्रणालीतून रुग्ण नोंदणी अवघ्या एका मिनिटात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत असतात. मात्र, या रुग्णालयात नेमक्या किती खाटा रिकाम्या आहेत, याची एकत्रित माहिती उपलब्ध होत नव्हती. त्यावर लवकरच महापालिका प्रशासनाकडून उपाय शोधण्यात आला असून, यासाठी प्रत्येक रुग्णालयामध्ये असलेल्या रिकाम्या खाटांच्या डॅशबोर्ड उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी महापालिका स्तरावर कार्यवाही प्रगतिपथावर असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत एका उत्तरात दिली.
महापालिकेच्या परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) या रुग्णालयातील मूलभूत सोयीसुविधांसंदर्भात श्रीकांत भारतीय, सदाशिव खोत, उमा खापरे आदींनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उत्तरात उपमुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये महापालिकेच्या स्तरावर ऑनलाइन संकेतस्थळ सुरू असून, तेथे आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) ही सुविधा कार्यान्वित असल्याचेही त्यांनी आपल्या उत्तरात सांगितले.
केईएममध्ये रुग्णालयात सद्यःस्थितीत एक एमआरआय मशीन व दोन सीटी स्कॅन मशीन २४ तास सुरू आहेत. एमआरआय व सीटी स्कॅनसाठी बाह्यरुग्णांची प्रतीक्षा यादी असते. तथापि, अत्यावश्यक रुग्णांचे एमआरआय व सीटी स्कॅन त्याच दिवशी आणि आंतररुग्णांचे एमआरआय व सीटी स्कॅन एक ते दोन दिवसांत केले जातात.
आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार आयसीयू बेड्सचे प्रमाण एकूण आंतरभरती रुग्णसंख्येच्या पाच टक्के ते १० टक्के आहे. केईएम रुग्णालयातल्या आयसीयू बेड्सची संख्या ३१२ आहे. एकूण आंतरभरती रुग्णसंख्येची संख्या १,९५० गृहीत धरल्यास उपलब्ध बेड्सचे प्रमाण अंदाजे १६ टक्के आहे, जे जागतिक नियमावलीच्याही अधिक आहे. या रुग्णालयात जागेअभावी आयसीयू बेड्स वाढवणे सस्थितीत शक्य नसल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले.
एका मिनिटांत रुग्णांची नोंदणी
केईएमध्ये २३ नोंदणी कक्ष असून, एचएमआयएस नोंदणीसाठी प्रतिरुग्ण एक मिनिट इतका वेळ लागतो. या रुग्णालयात नवीन इमारत (बहुमजली इमारत) ही तळमजला अधिक १३ मजल्याची असून या इमारतीमध्ये एकूण ११ उद्वाहनांपैकी सहा उद्वाहन कार्यरत आहेत. प्रसंगी एखादी लिफ्ट बंद पडल्यास संबंधित परिरक्षण कंत्राटदाराकडून लिफ्ट तातडीने सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही रुग्णालयामार्फत पार पाडण्यात येते.
हवेसाठी मुबलक व्यवस्था
सद्यःस्थितीत केईएम रुग्णालयात सर्व बाह्यरुग्ण विभाग, कक्ष आणि इतर विभाग या ठिकाणी हवेकरिता मुबलक पंख्याची व्यवस्था आहे. याव्यतिरिक्त उपभोक्ता विभागाच्या मागणीनुसार त्यांनी सुचविलेल्या ठिकाणी तत्काळ पंख्यांची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही उत्तरात सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

