सोनशिव शाळेच्या गुणवत्तेत भर; क्रीडा व शिक्षणात उल्लेखनीय कामगिरी

सोनशिव शाळेच्या गुणवत्तेत भर; क्रीडा व शिक्षणात उल्लेखनीय कामगिरी

Published on

सोनशिव शाळेच्या गुणवत्तेत भर; क्रीडा व शिक्षणात उल्लेखनीय कामगिरी

वाडा, ता. ३ (बातमीदार) : वाडा तालुक्यातील सोनशिव शाळेने यावर्षी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल परिसरात कौतुक व्यक्त होत आहे.
क्रीडा क्षेत्रात केंद्रस्तर, बीटस्तर आणि तालुका स्तरावर अनेक पारितोषिके पटकावून शाळेने जिल्हा स्तरावर धडक मारली. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत भूमिका कोलेकरने लांब उडीत सुवर्णपदक, तर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. मुलींच्या कबड्डी संघानेही दमदार खेळ सादर केला.
जिल्हा परिषदेतर्फे गुणवंत विद्यार्थी म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर जिल्हा परिषद यांच्या हस्ते करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्तेतही शाळेने ठसा उमटवला आहे. एनएमएमएस स्पर्धा परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. केशव सृष्टी तर्फे आयोजित विज्ञान मेळाव्यात शाळेने प्रथम क्रमांक मिळवला, तर गणित ऑलिंपियाडमध्ये दोन्ही गटांत उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली. तसेच इको व्हिलेज गालतरे तर्फे आयोजित श्रीमद्‍भगवद्‍गीता प्रश्नावली स्पर्धेत तनुजा चौरे हिने प्रथम क्रमांक पटकावत रु. १५०० रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह मिळवले, तर अक्षरा घाटाळ हिने द्वितीय क्रमांक मिळवत रु. १००० रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्राप्त केले. लहान गटाच्या समूहगीत स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळाला.
गौरवास्पद बाब म्हणजे समग्र शिक्षा अभियान पालघर तर्फे संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अभ्यास दौऱ्यासाठी शाळेचे सहा विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक वसंत ठाकरे यांची जिल्हा स्तरावरून निवड झाली आहे. शनिवारी (ता. २८) शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच राष्ट्रीय गणित दिनानिमित्त भव्य गणित मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या यशाबद्दल गावात विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पालक व माता-भगिनींनी औक्षण करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शाळेच्या प्रगतीबाबत मुख्याध्यापकांनी सांगितले की, शिक्षकवर्ग, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, बालभवन टीम आणि विद्यार्थी हे सर्व जण मेहनत व प्रामाणिकपणे आपापली जबाबदारी पार पाडत असल्यामुळेच हे यश शक्य झाले. तसेच पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी उमेश सातपुते, विस्तार अधिकारी सोनवणे आणि केंद्रप्रमुख सुरेश ढवळे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी नमूद केले. शैक्षणिक, आध्यात्मिक आणि क्रीडा क्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीमुळे सोनशिव शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

वाडा : मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com