‘सायबर क्राईम राक्षसा’चे दहन
विरारमध्ये ‘सायबर क्राईम राक्षसा’चे दहन
सामाजिक संदेश देत होळी साजरी
बोळिंज, ता. ३ (बातमीदार) : विरारमध्ये यंदा विविध सामाजिक संदेशांसह होळी साजरी करण्यात आली. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जात असताना विरार पश्चिमेतील चाणक्य उत्कर्ष मंडळाने ‘सायबर क्राईम राक्षसा’चे दहन करून जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबवला.
सायबर गुन्ह्यांमुळे होणारी आर्थिक फसवणूक, मानसिक त्रास आणि वाढती गुन्हेगारी याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मंडळाने यंदा सायबर क्राईमचे प्रतीकात्मक राक्षस तयार केले. राक्षसाचे डोके संगणकासाठी वापरात येणाऱ्या माऊसचे प्रतीक दाखवून, सायबर गुन्हे कसे डोक्यात शिरून समाजाला त्रास देतात, हा संदेश या रचनेतून देण्यात आला. हा राक्षस तयार करण्यासाठी हजारो कागदाच्या प्लेट्स आणि काट्यांचा वापर करून, सुमारे १५ दिवसांच्या परिश्रमातून ही आकर्षक व संदेशप्रधान कलाकृती साकारण्यात आली. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की ही संकल्पना संपूर्ण मंडळाची असून समाजातील वाईट प्रवृत्तींचे प्रतीकात्मक दहन करण्याचा उद्देश आहे.
चाणक्य उत्कर्ष मंडळ गेल्या चार-पाच वर्षांपासून अशा प्रकारे सामाजिक संदेश देणारी होळी साकारत आहेत. यापूर्वी महिलांवरील अत्याचार व बलात्काराविरोधात राक्षस दहन, डासांमुळे होणाऱ्या समस्यांवर जनजागृती तसेच कोरोना काळात ‘कोरोना राक्षसा’चे दहन करण्यात आले होते. यंदाच्या ‘सायबर क्राईम राक्षसा’च्या होळीमुळे परिसरात जनजागृतीबरोबरच सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

